निवड यादीत स्थान मिळवा, ‘युपीएससी’चे विनामूल्य प्रशिक्षण घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:23 PM2022-01-05T17:23:54+5:302022-01-05T17:24:16+5:30
पात्र होऊन निवड यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘युपीएससी’चे विनामूल्य प्रशिक्षण मिळते. त्यासह त्यांना दरमहा विद्यावेतन दिले जाते.
कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षेकरिता राज्यातील सहा प्रशिक्षण केंद्रांतील प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यात पात्र होऊन निवड यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘युपीएससी’चे विनामूल्य प्रशिक्षण मिळते. त्यासह त्यांना दरमहा विद्यावेतन दिले जाते. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कोल्हापुरातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रात (प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर) प्रशिक्षणाबाबतच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत.
कोल्हापूरमध्ये प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर सन १९८५ मध्ये राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात सुरू झाले. सन २०११ मध्ये या केंद्राचे स्वतंत्र इमारतीत स्थलांतरण झाले. सन १९९२ पासून आतापर्यंत या केंद्राचे एकूण ४७ विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आदी अधिकारी झाले आहेत.
सध्या केंद्रात एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेता येते. त्यात केंद्राच्या ६०, तर बार्टी संस्था आणि अल्पसंख्याक आयोगाच्या प्रत्येकी दहा जागांचा समावेश आहे. कोल्हापूरसह मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या केंद्रातील प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये पात्र होऊन निवड यादीत स्थान मिळाल्यास तेथून पुढे युपीएससी (आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस,आदी) पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी विनामूल्य मार्गदर्शन केले जाते.
केंद्रातील ६० विद्यार्थ्यांना दरमहा चार हजार, बार्टी अनुदानित विद्यार्थ्यांना सात हजार आणि अल्पसंख्याक आयोगाच्या विद्यार्थ्यांना चार हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. ‘युपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणारे असल्याचे कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या प्रभारी संचालक डॉ. लता जाधव यांनी मंगळवारी सांगितले.
१२ जानेवारीला होणार मॉक टेस्ट
कोरोना, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सामाईक प्रवेश परीक्षा दि. १६ जानेवारीला ऑनलाईन होणार आहे. या परीक्षेचे स्वरूप समजावे या उद्देशाने दि. १२ जानेवारीला सकाळी अकरा ते दुपारी एकदरम्यान मॉकटेस्ट होणार आहे. प्रवेश परीक्षेला ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार(दि.७)पर्यंत, तर शुल्क भरण्याची अंतिम मुदत रविवार(दि.९)पर्यंत आहे.
केंद्रातील विविध सुविधा
चोवीस तास अभ्यासिका, स्वतंत्र कक्ष, ग्रंथालय, वृत्तपत्र वाचन कक्ष, मॉक इंटरव्ह्यू आणि अन्य बैठकीसाठी हॉल, ६४ विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे वसतिगृह, वाय-फाय सुविधा
‘युपीएससी’तील यशाचे ध्येय ठेऊन विद्यार्थ्यांनी तयारी करावी. राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेद्वारे उपलब्ध प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन लेक्चरची सुविधाही उपलब्ध आहे. -डॉ. लता जाधव, प्रभारी संचालक, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटर