राष्ट्रवादीची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:28 AM2021-09-05T04:28:46+5:302021-09-05T04:28:46+5:30
चंदगड : राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवायचे काम करा, म्हणजे याचा फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ...
चंदगड : राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवायचे काम करा, म्हणजे याचा फायदा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत निश्चित होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी व्यक्त केला. ते शनिवारी शिनोळी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
जिल्हाध्यक्ष पुढे म्हणाले की, आमदार राजेश पाटील यांनी नवखे असतानाही १७० कोटींचा निधी आणून भरीव कामगिरी केली आहे. विकास कसा करावयाचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार पाटील होय. जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या मानाने खूप उजवे काम केले आहे. कै. नरसिंगराव पाटील यांचा आदर्श ठेवला असून यापुढेही त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीला आमदार राजेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे तर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष भिकू गावडे यांनी कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर शिवानंद हुंबरवाडी यांनी प्रास्ताविक केले. तसेच या बैठकीत तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा संगीता खवणेवाडकर-पाटील, तानाजी वाघमारे, वसंत जोशीलकर, उदय पाटील, तालुका संघ संचालक जानबा चौगुले यांनीही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणार असल्याचे सांगितले.
आमदार पाटील म्हणाले की, तालुक्यातील २७५ गावांमध्ये विकास निधी पोहोचविला आहे. शिनोळीत शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय ही लवकर सुरू करणार आहे. तसेच मतदारसंघात आमदार म्हणून मी पोहोचलो नसलो तरी माझे कार्यकर्ते पक्षाची ध्येयधोरणे पोहोचविण्यात कुठेच कमी पडणार नाहीत. तसेच आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविला जाईल, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली.
बैठकीला नगराध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष गंगाधर व्हसकोटी, संतोष मेंगाणे, श्रीश देसाई, बाळासाहेब देशमुख, डॉ. हरीश पाटील, यासीन मुजावर विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
मित्र पक्षांना समज द्यावी
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना असे महाविकास आघाडीचे सरकार आहे. तालुक्यातही मित्रपक्षांनी चांगल्या कामासाठी आडकाठी करू नये, तुम्ही वरिष्ठ पातळीवर मंत्री हसन मुश्रीफ व ए. वाय. पाटील यांनी त्यांना समज द्यावी, अशी विनंतीही आमदार पाटील यांनी केली.
फोटो ओळी : शिनोळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आमदार राजेश पाटील, अनिल साळोखे व पदाधिकारी उपस्थित होते.
क्रमांक : ०४०९२०२१-गड-०३/०४