संवाद माध्यमांच्या गर्दीत प्रत्यक्षातील संवाद हरपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 11:34 PM2017-01-28T23:34:27+5:302017-01-28T23:34:27+5:30

मोहन आगाशे : प्रसारमाध्यमांकडे करमणूक म्हणून पाहू नका

Communicating media crowded out the actual dialogue | संवाद माध्यमांच्या गर्दीत प्रत्यक्षातील संवाद हरपला

संवाद माध्यमांच्या गर्दीत प्रत्यक्षातील संवाद हरपला

Next



सांगली : टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या संवादमाध्यमांत आजचा समाज आणि विशेषत: तरुणाई फार गुंतून गेल्याने जीवनशैलीच बदलत चालली आहे. प्रत्येकाच्या जीवनातला प्रत्यक्ष संवाद हरपला आहे, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते व मनोविकार तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी शनिवारी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांकडे करमणूक म्हणून पाहू नका, असेही त्यांनी सांगितले.
येथील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तिसरी राज्यस्तरीय व अकरावी विद्यापीठस्तरीय मानसशास्त्र परिषद आयोजित करण्यात आली होती. दुपारच्या सत्रात ‘प्रसारमाध्यमांचा होणारा परिणाम’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. आगाशे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील होते.
आगाशे म्हणाले की, टीव्ही, रेडिओ, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्-अ‍ॅप या संवाद माध्यमांचा आज समाजावर विपरित परिणाम होत आहे. भावनेची भाषा हीच संवेदनाची भाषा आहे, त्यात संतुलन असणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालकांनी योग्यवेळी उपाय करण्यासाठी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. प्रसारमाध्यमे पूर्वी प्रिंटमध्ये होती. अजूनही अनेक माध्यमे प्रिंटमध्ये टिकून आहेत. आज याच माध्यमांनी ‘डिजिटल’ युगात प्रवेश केला आहे. आजची पिढी याकडे करमणूक म्हणून, तर चित्रपटाकडे शिक्षण म्हणून पाहात आहेत. प्रत्येकाच्या खिशात मोबाईल मिळेल, पण पेन मिळणार नाही. सुशिक्षित म्हणवून घेणारी ही पिढी ‘डेंजर झोन’मध्ये गेली असून, तिला वेळीच बाहेर काढण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, पूर्वी माहिती उशिरा मिळायची, मात्र अनुभव आलेला असायचा. परंतु आता नको तेवढी माहिती तातडीने मिळत असली तरी, कोणताही अनुभव नसतो. जीवन म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. प्रसारमाध्यमे आणि संवादमाध्यमे कशासाठी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. पूर्वी टीव्ही, रेडिओ याकडे अधिकृत बातमीची माध्यमे म्हणून पाहिले जात असे. मात्र याकडे आता करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जात असून, ही चिंताजनक बाब आहे. सध्या घरची संकल्पना बदलत आहे. लहान मुलांचे व ज्येष्ठांचे काय करायचे, असा कुटुंबातील नोकरदार तरुण-तरुणींना प्रश्न पडतो. कारण त्यांना बाहेर फिरायला जायचे असते. त्यांच्यावर आता प्रसारमाध्यमांनी संस्कार करण्याची गरज आहे.
यावेळी संस्थेचे मानद सचिव सुहास पाटील, खजिनदार अ‍ॅड. विजयकुमार सकळे, शाळा समितीचे अध्यक्ष अभय पाटील, सनतकुमार आरवाडे, शिवाजी विद्यापीठाचे मानसशास्त्र परिषद कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. आर. के. आडसूळ, कार्यवाह प्रा. डॉ. एस. बी. चव्हाण, संस्थापक-अध्यक्ष प्रा. एस. जी. माळी उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. मृणालिनी चितळे यांच्याहस्ते झाले. डॉ. एम. जी. जाधव परिषदेचे कार्याध्यक्ष होते. प्राचार्य व्ही. बी. कोडग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. आर. एम. हातकणंगलेकर यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. प्रा. महावीर पाटील व प्रा. सोनाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. समीर
पाचोरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


मनात ‘सैराट’चे विचार!
अभ्यास करताना शुद्धीवर असतो, पण भानावर नसतो. पुढे पुस्तक असूनही त्यातील शब्द दिसत नाही, कारण मनात ‘सैराट’चे विचार घोळत असतात, असे आगाशे यांनी सांगताच सभागृहात विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये ‘हशा’ पिकला. ते पुढे म्हणाले की, निबंध लिहिताना विचार करावा लागतो. फोटो काढताना विचार केला जात नाही. मग तो कसा का येईना. ‘सैराट’ चित्रपट भावला; मात्र ‘शाळा’, ‘अस्तू’ अशा चित्रपटांमधूनही शिकण्यासारखे बरेच काही आहे. याकडे गांभीर्याने पाहात नसलेली सुशिक्षित तरुणाई ‘डेंजर झोन’मध्ये आहे.


कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात शनिवारी अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून प्राचार्य व्ही. बी. कोडग, विजयकुमार सकळे, सुहास पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

Web Title: Communicating media crowded out the actual dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.