मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी कोल्हापूरात सामुदायिक शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 04:29 PM2019-06-24T16:29:26+5:302019-06-24T16:32:19+5:30
कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली.
कोल्हापूर : कन्नड, तामीळ या भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याप्रमाणे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौक येथे सोमवारी सकाळी सामुदायिक शपथ घेण्यात आली.
मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे, अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर शिवशाहीर राजू राऊत यांनी उपस्थितांना शपथ दिली.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शरद सामंत, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, दुर्गेश लिंग्रज, राजेंद्र जाधव, दिनेश परमार, धनाजी यादव, रणजित आयरेकर, योगेश शिंदे, प्रतीक क्षीरसागर, राजेंद्र पाटील, चंद्रकांत भोसले, आदी उपस्थित होते.
अशी घेतली शपथ
माझी मातृभाषा मराठी या भाषेचा सन्मान, या भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा, जागतिक स्तरावर या भाषेचा विचार व्हावा; यासाठी मी शपथबद्ध आहे. मी रोजच्या व्यवहारात, कुटुंब-समाज, कार्यालय, सार्वजनिक संस्था येथे मराठी भाषेतूनच संवाद करेन, तसेच मराठी भाषेतून शासकीय, निमशासकीय कार्य होण्यासाठी आग्रही असेन. या भाषेतील पुस्तके, नाटके, चित्रपट, आदी कार्यक्रमांना माझे प्राधान्य असेल.
परभाषेच्या आक्रमणापासून मराठी वाचविण्यासाठी, पुढील पिढीला या भाषेचा गोडवा, समृद्धी व महत्त्व पटवून देईन. संगणकावरही मराठी टंकलेखनाचा आग्रह मी धरेन. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या भाषेच्या प्रवाहीपणासाठी ही अभिजात भाषा राहावी, ही माझी मनाची इच्छा आहे. मराठी भाषेचा भविष्यातील गौरव, सन्मान हे माझे ध्येय आहे.
शिवसेनेच्या वतीने सोमवारी बिंदू चौकात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा; यासाठी सामुदायिक शपथ घेण्यात आली.