कम्युनिटी पोलिसिंग योजना राबविणार :नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:58 PM2019-03-01T12:58:34+5:302019-03-01T13:40:57+5:30
समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने ‘कम्युनिटी पोलीस’ योजना राबविणार असल्याचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे सांगितले.
कोल्हापूर : समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने ‘कम्युनिटी पोलीस’ योजना राबविणार असल्याचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे सांगितले.
गुरुवारी ताराबाई पार्कातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडून वारके यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नांगरे -पाटील यांची नाशिक येथे पोलीस आयुक्त या पदावर बदली झाली आहे.
डॉ. वारके म्हणाले, जे काही समाजासाठी योग्य रीतीने करता येईल, त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. कडक शासन आणि गुन्हेगारांवर वचक हे माझ्या दृष्टीने प्राधान्य राहील. याचबरोबर कायदा, सुव्यवस्था आणि विविध आंदोलने योग्य पद्धतीने हाताळणार आहे.
सर्वसामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून कायद्याची अंमलबजावणी करणार आहे. तसेच परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हा व सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण येथील अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद साधणार आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. नांगरे-पाटील यांनी पोलीस कल्याणासाठी यापूर्वी जे उपक्रम राबविले, तेच उपक्रम पुढे तसेच नवीन चांगले उपक्रमही सुरू करणार आहे. यावेळी वारके यांना पोलिसांसह नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
वारके २००० च्या बॅचचे अधिकारी
मी मूळचा जळगाव येथील. एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण केले व औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ काम केले. २००० ला भारतीय प्रशासन सेवेत (आय.पी.एस.) दाखल झालो. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड पोलीस ठाणे येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक म्हणून २००२ ला पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर किनवट (जि. नांदेड) येथे सहायक पोलीस आयुक्त, मालेगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक, सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त, बीड जिल्हा पोलीस अधीक्षक, तर फेब्रुवारी २००९ मध्ये मुंबई परिमंडळ तीन व २०११ ला परिमंडळ दहाचे पोलीस आयुक्त म्हणून काम केले.
राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये (एन.आय.ए) २०१२-१६ ला पोलीस उपमहानिरीक्षक या पदावर, तर २०१६ ला नागपूर शहरला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांची दोन पदके मिळाली आहेत. अमेरिकेत एफ. बी.आय. या प्रशिक्षण संस्थेत तीन महिने काम केले आहे. जुलै-आॅगस्ट २०१८ ला पोलीस महानिरीक्षक (आय. जी.) म्हणून बढती मिळाली. येथे येण्यापूर्वी मी मुंबईतील दहशतवादविरोधी पथकात (ए. टी. एस.) पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होतो, असे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांनी यावेळी सांगितले.