महापुरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दोन दिवसात भरपाई, पालकमंत्री सतेज पाटील यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 04:07 PM2022-01-01T16:07:12+5:302022-01-01T16:07:41+5:30
अतिवृष्टीमुळे शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पूरबधित क्षेत्रातील सुमारे तीन हजार व्यापारी आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले होते.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील महापुरामध्ये नुकसान झालेल्या पात्र व्यापाऱ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई देण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले.
पूरबधित नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांची अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात भेट घेऊन याबाबत मागणी केली. यावेळी करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे-भामरे उपस्थित होत्या.
जुलै २०२१ च्या महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पूरबधित क्षेत्रातील सुमारे तीन हजार व्यापारी आणि व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त व्यापारी आणि व्यावसायिकांना शासन स्तरावरून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात महानगरपालिका हद्दीतील पात्र ३५२ व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली.
त्यानंतर सर्वेक्षण करून उर्वरित दुसऱ्या यादीतील २१५५ पात्र नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक प्रतिनिधी अमर समर्थ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी सहा महिने झाले अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे सांगितले.
शहरात पूरबधित क्षेत्रात ३१६ विनापरवाना असलेल्या व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले आहे. त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी महापुरामुळे नुकसान झालेली शहरातील पात्र २१५५ व्यापाऱ्यांना दोन दिवसात नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश तहसीलदार यांना दिले. त्याचबरोबर जे विना परवाना व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांना शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांनाही मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली.
नुकसान भरपाईसाठी प्रशासनाला तत्काळ आदेश दिल्याबद्दल व्यापाऱ्यांनी पालकमंत्री पाटील यांचे आभार मानले. यावेळी शशिकांत पाटील, विशाल पाटील, रमजान गणीभाई, संभाजी आरेकर, साजिद खतीब, अस्लम बागवान, निवास कलबुर्गी, प्रमोद चरणे आदी उपस्थित होते.