गत महापुरातील नुकसानभरपाई अजूनही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:18+5:302021-08-13T04:27:18+5:30
उदगांव : २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे वरिष्ठ पातळीवर पोहोचले आहेत; परंतु ठरावीक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले ...
उदगांव : २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे वरिष्ठ पातळीवर पोहोचले आहेत; परंतु ठरावीक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांना अजूनही एक वर्षे उलटले तरीही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे उदगाव आणि चिंचवाडमधील शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. हे अनुदान तातडीने जमा करा, अशी मागणी होत आहे. २०२० मध्ये मोठा पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने त्याचे पंचनामेही पूर्ण केले. ते तहसील कार्यालयाला पाठविल्यानंतर पडताळणी करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणे गरजेचे होते; परंतु ठरावीक शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ झाला असून उर्वरित शेतकऱ्यांना का अनुदान मिळालेले नाही, हेही गुलदस्त्यात आहे. उदगांवमधून ९३ शेतीचे, तर चिंचवाडमधून ८७ अतिवृष्टीबाधित शेतीचे पंचनामे झाले होते. अतिवृष्टीधारकांना ६८०० रुपये प्रतिहेक्टर व ३ हजार २०० रुपये प्रतिहेक्टर अशा दोन टप्प्यात पैसे मिळणार होते; परंतु बँक व तहसील कार्यालय यांच्यामध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे यास विलंब होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
कोट : अतिवृष्टीमुळे आमच्या शेतीचे नुकसान झाले होते. शासनाने त्यास अनुदान देण्याचे घोषित केल्यानंतर पंचनामे पूर्ण झाले; परंतु ठरावीक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले, पण माझ्या खात्यावर वर्षानंतरही अनुदान जमा झालेले नाही. हा गोंधळ नेमका काय झाला आहे. यावरही कोण उत्तर देत नाही.
- कुमार चौगुले, शेतकरी, उदगांव.