हातकणंगलेतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाखांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:37 AM2021-02-26T04:37:06+5:302021-02-26T04:37:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : गतवर्षी गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४० लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. या संदर्भात आमदार राजू आवळे यांनी विशेष प्रयत्न शासनदरबारी करीत सतत पाठपुरावा केला. याला यश मिळून शेतकऱ्यांना मोठी नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक भरपाई हातकणंगले तालुक्याला मिळाली असून, लाटवडे गावासाठी २९ लाख १६ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
मे महिन्यात प्रचंड गारपिटीचा पाऊस झाला. लाटवडे, सावर्डे गावांतील ऊसशेतीचे अतोनात नुकसान झाले होते. इतर गावांतही केळी, भाजीपाला पिके उद्ध्वस्त झाली होती. याची दखल घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून आमदार राजू आवळे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. खासदार धैर्यशील माने यांनीही अधिकाऱ्यांसोबत भेट देऊन पाहणी केली होती. परिसरातील नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे करून माहिती वरिष्ठ विभागाला पाठवा, अशा सूचना दिल्या. राजू आवळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादासो भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. आवळे यांनी नुकसान भरपाई मिळवून देणारच हा शेतकऱ्यांना दिलेला शब्द खरा करून दाखविला आहे.
सुमारे ३०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. यासाठी ७२६ शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. लाटवडे, सावर्डे, नेज, किणी, वाठार तर्फ वडगाव, घुणकी, चावरे, तळसंदे, भादोले येथील शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
चौकट-
गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदत होणे ही गरज होती. यासाठी जो पाठपुरावा केला त्याला यश आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील(यड्रावकर) यांचे या कामी सहकार्य लाभले.
- राजूबाबा आवळे, आमदार, हातकणंगले विधानसभा