२०१९ला दिलेल्या नुकसानभरपाईप्रमाणे आताही भरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:23 AM2021-08-01T04:23:57+5:302021-08-01T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : पूरग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी गायरानात मोठी बिल्डिंग उभी करणे गरजेची आहे. यामध्ये दोन खोल्यांची व्यवस्था एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : पूरग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी गायरानात मोठी बिल्डिंग उभी करणे गरजेची आहे. यामध्ये दोन खोल्यांची व्यवस्था एका कुटुंबासाठी असावी. पूरकाळात याठिकाणी राहण्याची सुरक्षित व्यवस्था होईल. पूर ओसरल्यानंतर पुन्हा स्वतःच्या घरी लोक जातील. शासनाने सन २०१९मध्ये महापूर काळात केलेल्या मदतीप्रमाणे आताही मदत देणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
खोची, भेंडवडे येथील पूरस्थितीची पाहणी करून चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी गायरानातील भूखंड द्या, आमचे पुनर्वसन करा, पिकांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, महापुराच्या संदर्भात कायमचे उत्तर शोधले पाहिजे. शिवाजी विद्यापीठातील तज्ञ लोकांनी अभ्यास करून उपाय सांगणे गरजेचे आहे. यावेळी महापूर मोठ्या प्रमाणात आला, नुकसानही प्रचंड झाले आहे. शासनाने तत्काळ नुकसानभरपाई दिली पाहिजे.
जय शिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी वारणा पट्ट्यातील महापुराने ऊस, सोयाबीन, भुईमूग पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहेत. त्यांना आधार देणारी मदत करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी केली.
खोची येथील भेटीवेळी जिल्हा परिषद सदस्य अशोक माने, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, अशोक माळी, नाना जाधव, राहुल चिकोडे, डॉ. अशोक चौगुले, भगवान काटे, सरपंच जगदीश पाटील, अमरसिंह पाटील, दादासो पाटील, वसंत गुरव, दीपक पाटील, विवेक कुलकर्णी, रमेश मगदूम, बंडा गोंदकर, संतोष पाटील उपस्थित होते. भेंडवडे येथे सरपंच काकासो चव्हाण, संजय देसाई, सुहास देसाई, उदय माने, अर्जुन निकम, प्रमोद देसाई, जगन्नाथ माने, सुनील लाड, जगन्नाथ माने आदी शेतकरी व पूरग्रस्त उपस्थित होते.
फोटो ओळी : खोची येथे पूरग्रस्त भागाची पाहणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी अशोक माने, जगदीश पाटील, अशोक माळी, बंडा गोंदकर आदी उपस्थित होते.
३१ खोची भाजप चंद्रकांतदादा