देशभरातील कोरोना सेंटरची मिळेल माहिती अशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 10:45 AM2020-05-04T10:45:34+5:302020-05-04T11:33:11+5:30
देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना परवानगी पास मिळविण्यासाठी कोरोना कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याची माहिती उपयुक्त ठरणार आहे.
कोल्हापूर : देशातील विविध राज्यांमधील कोरोना कंट्रोल रूमचे दूरध्वनी क्रमांक आणि संकेतस्थळ (वेबसाईट) याबाबतच्या माहितीचे संकलन करून ती सोशल मीडियावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कार्यालयातील सोशल मीडिया टीमने हा उपक्रम राबविला आहे.
या टीमने विविध राज्यांमधील कोरोना कंट्रोल रूमशी संपर्क साधण्यासाठी तेथील दूरध्वनी क्रमांक, हेल्पलाईन नंबर, व्हॉट्स अॅप क्रमांक, संकेतस्थळाची माहिती शोधून ती संकलित केली. ही माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांच्या सोशल मीडियावरील (ट्विटर, फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्ट्राग्राम, संकेतस्थळ) अधिकृत अकाऊंटच्या माध्यमातून प्रसारित केली आहे. घरी जाण्यासाठी परवानगी मिळविताना परराज्यातील नागरिकांना काही अडचण, शंका असल्यास या माहितीनुसार त्यांना राज्यातील कोरोना कंट्रोल रूमशी संपर्क साधता येणार आहे. अधिक माहिती हवी असल्यास ते संबंधित राज्यांच्या संकेतस्थळालाही भेट देऊ शकतील. देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना परवानगी पास मिळविण्यासाठी कोरोना कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याची माहिती उपयुक्त ठरणार आहे.
संभ्रमावस्था दूर होण्यास मदत
लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये अन्य राज्यांतील विद्यार्थी, कामगार, नागरिक थांबून आहेत. त्यांना त्यांच्या राज्यांमध्ये जाण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, या नागरिकांना त्यासाठी आंतरराज्य परवानगी मिळविणे आवश्यक आहे. ही परवानगी कशी मिळवायची, त्यासाठी कोठे संपर्क साधायचा याबाबत विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांमध्ये सध्या संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्यासाठी गृहराज्यमंत्री पाटील यांच्या संकल्पनेनुसार संकलित केलेल्या माहितीची मदत होणार आहे.
या राज्यांतील कंट्रोल रूमची माहिती
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिसा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड.
आपल्या राज्यात येण्यासाठीच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यांतून लोकांचे दूरध्वनी मला आणि माझ्या कार्यालयात येत आहेत. परराज्यांतून येणाऱ्या लोकांनी त्या-त्या राज्यांमधील कोरोना कंट्रोल रूममध्ये अर्ज करायचे आहेत. त्याची माहिती या लोकांना नाही. त्यामुळे विविध राज्यांतील कोरोना कंट्रोल रूमचे दूरध्वनी क्रमांक, संकेतस्थळांची माहिती आम्ही संकलित केली. ही माहिती लोकांच्या माहितीस्तव आणि त्यांना मदत व्हावी म्हणून एकत्रितपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
- सतेज पाटील, गृहराज्यमंत्री