सावकारांविरोधात तक्रार द्या
By admin | Published: March 26, 2016 12:25 AM2016-03-26T00:25:04+5:302016-03-26T00:25:49+5:30
पोलिसांकडून आवाहन : सावकारांवर कठोर कारवाई होणार
कोल्हापूर : दहा ते तीस टक्के व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणारे खासगी सावकार वसुलीसाठी तगादा लावत असतील, दमदाटी करीत असतील तर त्यांच्या विरोधात निर्भयपणे नागरिकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी शुक्रवारी केले.
दरम्यान, बांधकाम व्यावयायिक अमोल पवार याच्या जबाबावरून शुक्रवारी दिवसभर प्रकाश रमेश टोणपे, स्वरूप किरण मांगले, रणजित अशोक चव्हाण या तिघा सावकारांकडे कसून चौकशी केली. चौकशीमध्ये काही सावकार दोषी आढळले असून, त्यांच्या विरोधात लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याचेही निरीक्षक मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उकलून या प्रकरणी कटाचा सूत्रधार अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, कोल्हापूर शहर व उपनगरांतील खासगी सावकारांकडून त्यांनी सुमारे तीन कोटी ६० लाख रुपये कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले. या सावकारांनी या रकमेवर दहा ते तीस टक्के व्याजाने वसुलीचा तगादा लावून पवार बंधूंना भंडावून सोडले होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून आपल्या मृत्यूचा बनाव करून सेंट्रिंग कामगाराचा खून केल्याची कबुली त्यांनी पोलिस चौकशीत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित खासगी सावकार प्रकाश रमेश टोणपे, सतीश गणपतराव सूर्यवंशी, दत्ता नारायण बामणे, रमेश लिंबाजी टोणपे, स्वरूप किरण मांगले, अशोक बाबूराव तनवाणी, प्रफु ल्ल अण्णासो शिराळे, सूरज हणमंत साखरे, नीलेश जयसिंगराव जाधव, पांडुरंग अण्णासो पाटील, रणजित अशोक चव्हाण, बिपीन ओमकारलाल परमार, अण्णा खोत, जयसिंगराव जाधव, प्रशांत सावंत (बेळगाव), आदी सावकारांना समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. गेल्या चार दिवसांपासून या सावकारांकडे कसून चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये या सावकारांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता मिळविल्याचे पुढे आले आहे. (प्रतिनिधी)
दोषी सावकारांना लवकरच अटक
चौकशीमध्ये शुक्रवारी दिवसभर प्रकाश टोणपे, स्वरूप मांगले, रणजित चव्हाण या तिघा सावकारांकडे कसून चौकशी केली. आतापर्यंतच्या चौकशीमध्ये काही सावकार दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल करून अटक केली जाईल, असेही मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.