शाळा, कॉलेजमध्ये ‘तक्रार पेटी’

By admin | Published: June 23, 2016 12:58 AM2016-06-23T00:58:23+5:302016-06-23T01:04:16+5:30

युवतींशी साधला संवाद : छेडछाडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांनी केले प्रबोधन

'Complaint box' in school, college | शाळा, कॉलेजमध्ये ‘तक्रार पेटी’

शाळा, कॉलेजमध्ये ‘तक्रार पेटी’

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्यात युवतींच्या छेडछाडीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बुधवारी शहरातील शाळा, महाविद्यालयांतील ‘लेडीज रूम’मध्ये तक्रार पेट्या बसविल्या. यावेळी युवतींशी संवाद साधून छेडछाड होत असेल तर निर्धास्तपणे तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहनही पोलिसांतर्फे करण्यात आले.
शहरासह उपनगर, ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या युवतींची भररस्त्यावर, बस स्टॉपवर, बसमध्ये छेडछाड केली जात आहे. फुलेवाडी-बोंद्रेनगर येथे पल्लवी बोडेकर या अल्पवयीन मुलीने वारंवार होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार गंभीर व सुन्न करणारा आहे. पल्लवीच्या आत्महत्येचे पडसाद जिल्ह्यात उमटले.
महिला संघटनांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन युवतींच्या सुरक्षेसाठी तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यानुसार बंद पडलेली तक्रार पेटी पुन्हा शाळा, महाविद्यालयांत सुरू करण्याचे आदेश देशपांडे यांनी पोलिस निरीक्षकांना दिले. त्यानुसार बुधवारी राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांतील ‘लेडीज रूम’मध्ये तक्रार पेट्या बसविल्या.
पोलिसांनी महाविद्यालयातील युवतींना विश्वासात घेत यावेळी तरुणांकडून छेडछाड होत असेल तर मनमोकळेपणाने तुम्ही बोला, पुढे या आणि तक्रार पेटीत तक्रार टाका, असे आवाहन केले.
या मोहिमेत पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, प्रवीण चौगुले, तानाजी सावंत, अनिल देशमुख यांच्यासह महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शहरातील महिला पोलिस अधिकाऱ्यांची बुधवारी मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांना शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन युवतींशी संवाद साधा, दर आठवड्याला तक्रार पेटीतील तक्रारी पाहून त्यांवर कारवाई करा. तसेच महिला बीट मार्शल यांना छेडछाडीचे फोन येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले.

Web Title: 'Complaint box' in school, college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.