विनयभंग गुन्ह्याचे बारा तासात दोषारोपपत्र दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 05:07 PM2017-09-09T17:07:54+5:302017-09-09T17:07:59+5:30
आढाववाडी (ता. पन्हाळा) येथे विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश पांडूरंग पाटील (वय २५) याचे विरोधात पोलीसांनी अवघ्या बारा तासात दोषारोपपत्र कळे न्या
कोल्हापूर : आढाववाडी (ता. पन्हाळा) येथे विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रकाश पांडूरंग पाटील (वय २५) याचे विरोधात पोलीसांनी अवघ्या बारा तासात दोषारोपपत्र कळे न्यायालयात दाखल केले.
अधिक माहिती अशी, आढाववाडी येथील १९ वर्षाची विवाहीत महिला शुक्रवारी (दि. ८) पतीला फोन करण्यासाठी राहते घराशेजारच्या शेतात गेली असता गावातील प्रकाश पाटील याने तिचा हात पकडून विनयभंग केला. त्यावेळी पिडीत महिलेने आरडा-ओरड केली असता पाटील हा ऊसाचे श्ेतामध्ये पळून गेला.
महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत कळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच संशयित शेतवडीत लपल्याचे पोलीसांना सांगितले. कळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मंगेश देसाई यांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले.
प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून साक्षीदार मिळवले. पंचनामा व इतर तपास पूर्ण केला. या घटनेची माहिती समजताच शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व तपासाची माहिती घेत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर गुन्हा दाखल झालेपासून अवघ्या बारा तासात आरोपीच्या विरोधात कळे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
विनयभंग गुन्ह्यात अशाप्रकारे तत्काळ तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र दाखल केलेचा पहिला गुन्हा आहे. या गुन्ह्याच्या कामी सहायक फौजदार सर्जेराव पाटील, इरफान गडकरी, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.