अनियमित पाणीपुरवठ्याबाबत नगरसेवकांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 07:05 PM2020-10-07T19:05:18+5:302020-10-07T19:13:55+5:30
water, problem, kolhapurnews, muncipalty बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, अनियमितता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; तसेच पाईपलाईनची व उपसा केंद्राजवळील गळती काढण्याचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्षस्थानी स्थायी सभापती सचिन पाटील होते.
कोल्हापूर : बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करा, अनियमितता निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या; तसेच पाईपलाईनची व उपसा केंद्राजवळील गळती काढण्याचे तत्काळ नियोजन करा, अशा सूचना बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. अध्यक्षस्थानी स्थायी सभापती सचिन पाटील होते.
पाणीपुरवठा नियोजन व्यवस्थित होत नाही. त्यात अनियमितता निर्माण झाली आहे. अभियंते व चावीवाले फोन उचलत नाहीत. अमृत योजनेचे काम ५० टक्केही पूर्ण झालेले नाही, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या. बालिंगा पाणी उपसा केंद्र सारखे बंद पडत आहे. पाण्याचे नियोजन बिघडत आहे याबाबत शारंगधर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली.
अंदाजित ४० कोटींची रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यामुळे अमृतमधील कामे मंजूर कामे तातडीने करावीत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गटनेते सत्यजित कदम, नगरसेवक नियाज खान, माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनीही आपल्या तक्रारी मांडल्या.
अमृत योजनेतून १२ पाण्याच्या टाक्या मंजूर आहेत. एक वर्ष होऊन गेले, मुदत संपली तरीही एकाही टाकीचे काम पूर्ण झाले नसून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली.
पंपिंग मशिनरी बदलणे, ओव्हरहॉलिंग करणे, फिल्टर हाऊस दुरुस्ती, फिल्टर मीडिया बदलणे, आदी कामांचा सहा कोटी रकमेचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे. पाणी उपसा पंपांचा डिस्चार्ज वाढविण्यासाठी नवीन पंपखरेदीचा प्रस्ताव करून पाठविण्यात आलेला आहे, असे जल अभियंता बी. एम. कुंभार यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त निखिल मोरे, उपजल अभियंता रामदास गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.