निधीवाटपाच्या आधी तक्रारी, मग गळ्यात गळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:29 PM2020-10-17T17:29:03+5:302020-10-17T17:31:04+5:30
zp, fund, kolhapurnews कोल्हापूर जिल्हा परिषदेत निधीवाटपातील असमानतेवरून विरोधकांशी सामना करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी स्वकियांचेच वाग्बाण झेलावे लागले. अध्यक्षांसह शिक्षण सभापतींच्या वाढीव निधीवर आक्षेप घेत, सदस्यांनी तक्रारींचे पाढेच वाचले. येथून पुढे झुकते माप देऊ, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तक्रारींनी सुरू झालेली बैठक महाविकास आघाडी एकसंधच राहील, असे सांगत गळ्यात गळे घालून संपली.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत निधीवाटपातील असमानतेवरून विरोधकांशी सामना करीत असलेल्या पदाधिकाऱ्यांना गुरुवारी स्वकियांचेच वाग्बाण झेलावे लागले. अध्यक्षांसह शिक्षण सभापतींच्या वाढीव निधीवर आक्षेप घेत, सदस्यांनी तक्रारींचे पाढेच वाचले. येथून पुढे झुकते माप देऊ, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर तक्रारींनी सुरू झालेली बैठक महाविकास आघाडी एकसंधच राहील, असे सांगत गळ्यात गळे घालून संपली.
बैठकीनंतर उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, पदाधिकाऱ्यांकडील वाढीव निधीबाबत सदस्यांमध्ये नाराजी होती; पण ती आम्ही दूर केली. त्यांची समजूत काढली असून, येथून पुढे महाविकास आघाडी म्हणून एकसंधपणे चांगला कारभार करू. विरोधकांना सामोरे जाऊ. निधीच्या वाटपाबाबत सदस्यांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन योजनेतील निधीचे वाटप केले जाईल.
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महाविकास आघाडीत निधीवाटपावरून रुसवे-फुगवे सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पार्टी मीटिंग बोलावली होती. समितीच्या सभागृहात दीड तास चाललेल्या या बैठकीत सत्ताधाऱ्यांनीच सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. सत्ता असूनही पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याबद्दलची खंत व्यक्त करीत सदस्यांनी जाब विचारला.
यावरून आवाज वाढल्याने समिती सभागृहातील वातावरणही तंग झाले. उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासने, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, पक्षप्रतोद उमेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व सदस्य बैठकीत सहभागी झाले.
जिल्हा नियोजनमधून जास्त निधी देऊ
पदाधिकारी म्हणून निधीवाटपात झुकते माप असणारच; पण येथून पुढे जिल्हा नियोजनमधून आणि १५ : २० या योजनेअंतर्गत येणारा निधी सदस्यांमध्ये जास्त प्रमाणात दिला जाईल, असेही बैैठकीत ठरले; पण हे गाजर ठरू नये, अशाही भावना सदस्यांकडून व्यक्त झाल्या. राज्यात आपलेच सरकार आहे, आपले नेते मंत्री आहेत; त्यामुळे निधी भरपूर मिळेल; पण आपल्यात हवेदावे नकोत, असे सांगून समजूत काढण्याचा पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न झाला.