भरतीपूर्वी अतिरिक्त शिक्षक समायोजन पूर्ण करा; खाजगी शिक्षक महासंघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:12 PM2019-03-30T14:12:21+5:302019-03-30T14:13:51+5:30
कोल्हापूर विभागातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता द्यावी. पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले.
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अनुदानित खासगी प्राथमिक शाळांच्या सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता द्यावी. पवित्र पोर्टल भरती सुरू करण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले.
कोल्हापूर विभागातील सांगली, सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सन २०१८-१९ मधील संचमान्यता शाळांना देण्यात आल्या आहेत; पण कोल्हापूर व सातारा जिल्ह्यामध्ये सन २०१८-१९ ची संचमान्यता अद्याप दिली नाही. कोल्हापूर विभागातील सर्वच जिल्ह्यांमधील प्राथमिक शाळांना त्वरित संचमान्यता द्यावी. ‘पवित्र पोर्टल’नुसार शिक्षकभरती सुरू होण्यापूर्वी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करावे.
ज्या संचमान्यतेमध्ये त्रुटी असतील अशा संचमान्यता दुरुस्तीबाबत योग्य शिफारशी करून त्या दुरुस्तीसाठी शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात याव्यात. कोल्हापूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांना आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षण निरीक्षक डी. एस. पोवार यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राज्य शिक्षकेतर प्रमुख एम. डी. पाटील, शहराध्यक्ष दस्तगीर मुजावर, जिल्हा शिक्षकेतर प्रमुख सागर जाधव, गौतम कांबळे, सुदर्शन सुतार, श्रीकांत पाटील, राजू निकम, आदी उपस्थित होते.