‘अंबाबाई’ आराखडा तपासणी पूर्ण
By admin | Published: February 10, 2017 12:43 AM2017-02-10T00:43:01+5:302017-02-10T00:43:01+5:30
एस. चोक्कलिंगम् : मार्च महिन्यात अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर होणार
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्राच्या आराखड्यासाठी अंबाबाई मंदिराच्या बाहेरील भागाची कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे यांच्याकडून तपासणी पूर्ण झाली असून, मंदिराच्या आतील भागाची तपासणी सुरू आहे. कॉलेजचे प्रोफेसर येथे येऊन लवकरच पाहणी करणार आहेत. यानंतर पुढील म्हणजे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती गुरुवारी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी गुरुवारी दिली.
जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियमित तपासणीसाठी ते कोल्हापुरात आले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.
पहिल्या टप्प्यातील ७२ कोटींच्या आराखड्यांतर्गत येणाऱ्या कामाच्या तांत्रिक तपासणीचे काम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणे यांच्याकडे दिले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून मंदिराबाहेरील भागाचे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या आतील भागाचे काम हे पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील असून, त्याचेही तपासणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर त्यांनी सुचविलेले काही बदल करून हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला जाईल. अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा एकूण २५५ कोटी रुपयांचा आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील आराखड्याचे काम हे ७२ कोटींचे आहे. अंबाबाई मंदिराला हेरिटेज लुक देण्याचा प्रयत्न आहे.
मंदिराच्या परिसरातील जुना राजवाडा पोलिस ठाणे ते शेतकरी संघाची इमारत असा आडवा प्रशस्त ‘दर्शन मंडप’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. तो २००० लोकांच्या क्षमतेचा असेल. शहरातील गाडी अड्डा व ताराबाई रोडवरील जागेवर पार्किंग केले जाणार आहे. त्याचबरोबर गाडी अड्ड्याजवळील पार्किंग येथे भक्त निवास बांधण्याचाही प्रस्ताव यावेळी महापालिकेकडून मांडला.
जोतिबावरील ‘एमटीडीसी’च्या इमारतीचा वापर होणार
जोतिबा डोंगर येथे भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे (एमटीडीसी) उभारण्यात आलेली इमारत सध्या बंद आहे. ती ताब्यात घेऊन पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात येईल. यासाठी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. महिन्याभरात या कामाला सुरुवात होईल, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
दर्शन मंडपाची रचना
अंबाबाई मंदिराच्या परिसरातील जुना राजवाडा पोलिस ठाणे ते शेतकरी संघाची इमारत असा प्रशस्त ‘दर्शन मंडप’ उभारण्याचा प्रस्ताव आहे. या दुमजली वातानुकूलित इमारतीचे बांधकाम २४ स्क्वेअर मीटर, लांबी ४१ तर रुंदी १६.५ मीटर असेल. भाविकांसाठी स्वच्छतागृह, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष असे याचे स्वरूप आहे.
जिल्हा परिषदेची वसुली कमी
जिल्हा परिषदेच्या कामकाजाची प्रगती आहे; परंतु जिल्हा परिषदेची वसुली समाधानकारक नसून ती कमी आहे. ती वाढवावी अशा सूचना नियमित वार्षिक तपासणीवेळी दिल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.