तीन हजार संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण
By admin | Published: August 10, 2016 12:24 AM2016-08-10T00:24:39+5:302016-08-10T01:10:33+5:30
उर्वरित संस्थांचे लेखापरीक्षण महिन्याअखेर करण्याचे लेखापरीक्षकांना आदेश
कोल्हापूर : जिल्ह्यातील ६११० पैकी तीन हजार सहकारी संस्थांचे (दुग्ध सोडून) २०१५-१६ या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे महिन्या अखेर लेखापरीक्षण पूर्ण करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना देण्यात आले आहेत. अद्याप लेखापरीक्षण न झालेल्या संस्थांमध्ये औद्योगिक संस्थांचा भरणा अधिक आहे.
सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण आॅक्टोबरअखेर करणे बंधनकारक केले असून, त्याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्ह्णातील लेखापरीक्षकांची बैठक आयोजित केली होती. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) तुषार काकडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यासह तालुका लेखापरीक्षक, उपनिबंधक उपस्थित होते. यामध्ये ४२५ हून अधिक लेखापरीक्षक व लेखापरीक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. जुलैअखेर तीन हजारांहून अधिक संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित संस्थांचे आॅगस्टअखेर पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४४०० संस्थांना दोषदुरुस्ती अहवाल पाठविण्यास सांगितले होते.
त्यापैकी २६०० संस्थांचे अहवाल प्राप्त झाले असून, उर्वरित संस्थांचे दोषदुरुस्ती अहवाल तत्काळ पाठविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
लेखापरीक्षण व दोषदुरुस्ती अहवालाचा आढावा १३ सप्टेंबरला घेण्यात येणार असून, यामध्ये हयगय करणाऱ्या लेखापरीक्षकांवर कडक कारवाई केली जाईल, असे बाळासाहेब यादव यांनी सांगितले. ‘महासहकार’च्या आॅनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून नवीन नोंदणी, लेखापरीक्षण अहवाल, दोषदुरुस्ती अहवाल, संस्थांनी केलेले ठराव पाठविण्याचे आदेशही यादव यांनी दिले.
लेखापरीक्षकांचेही आॅनलाईन वाटप
संस्थांना लेखापरीक्षक निवडण्याची मुभा असली तरी त्यांच्यासह सर्वच संस्थांचे लेखापरीक्षकांचे वाटप आॅनलाईन करणार आहे.
त्यामुळे ज्या लेखापरीक्षकांना संस्था मिळालेल्या नाहीत, त्यांनाही संधी मिळणार असल्याचे यादव यांनी सांगितले.
राज्यात टॉपच राहू
लेखापरीक्षणात कोल्हापूर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत निम्म्या संस्थांचे लेखापरीक्षण झाले असून उर्वरित महिनाअखेर पूर्ण कोल्हापूर टॉपलाच राहील, असा विश्वास बाळासाहेब यादव यांनी व्यक्त केला.