करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची स्वच्छता पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:44 PM2018-10-06T14:44:24+5:302018-10-06T16:12:42+5:30

शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते.

Complete cleaning of Karabir Nivasini Shri Ambabai's complete decoration | करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची स्वच्छता पूर्ण 

शारदीय नवरात्रौत्सवोच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापुरच्या श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देकरवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची स्वच्छता पूर्ण सीसीटिव्ही, मांडव उभारणी, माहिती फलक

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पूरातन अलंकारांची व सोन्याच्या पालखीची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा देवीच्या अलंकारांना नवी झळाळी मिळते.

महाराष्ट्रासह देशातील शक्तीपीठांमध्ये समावेश असलेल्या श्री अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाची लगबग सध्या सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी जडावासह सोन्या-चांदीच्या अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. त्यात उत्सवमूर्तीच्या अलंकारांंचा व सोन्याच्या पालखीचा समावेश आहे. सकाळी दहा वाजता गरुड मंडपात कामाला सुरवात झाली.


शारदीय नवरात्रौत्सवोच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापुरच्या श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)


देवीच्या खजिन्याचे हवालदार असलेल्या इंद्रोजी खांडेकर यांच्या अकराव्या पिढीतील महेश खांडेकर यांच्याकडे सध्या हा मान आहे. रोज दुपारी बारा वाजता खांडेकर देवीचे अलंकार पुजाऱ्यांच्या ताब्यात देतात. रात्री नऊ वाजता शेजारतीपूर्वी हे दागिने पून्हा त्यांच्याकडे सुपूर्द केले जातात. सुरक्षेसाठी दोन बंदुकधारी जवान त्यांच्यासोबत असतात.

दागिने स्वच्छतेचे काम दुपारपर्यंत सुरू होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या कामाची पाहणी केली. स्वच्छतेत यात धोंडिराम कवठेकर, गजानन कवठेकर, उमेश लाड, उदय लाड, शैलेश इंगवले, संकेत पवार, दिपक धोंड, महेश कडणे, रमेश पोतदार, राजू निगडे यांनी सहभाग घेतला.

देवीेचे अलंकार

  1. नित्यालंकार : ठुशी, बोरमाळ, मोहराची माळ, सोळा पदरी चंद्रहार, म्हाळूंग, मोर, कुंडल, नथ.
  2. जडावाचे अलंकार : किरीट, कुंडल, लप्पा, पेंड, सातपदरी कंठी, चार पदरी कंठी, कृष्ण लॉकेट, मंंगळसुत्र, चंद्रकोर लॉकेट, कोल्हापुरी साज, बोरमाळ, मोहनमाळ
  3. उत्सवमूर्तीचे अलंकार : किरीट, कुंडल, ठुशी, बोरमाळ, चाफेकळीची माळ, पुतळ््याची माळ, लाल मण्यांची कंठी, छत्र
  4. इतर साहित्य : सोन्याची पालखी, गदा, चोपदार दंड, प्रभावळ.

 

पाच लाखांचा हार घालणार

अंबाबाईला घालण्यात येणारे सगळे अलंकार हे पुरातनकालीन आहेत.शिलाहार, यादव काळापासून अगदी आदिलशाही,शिवशाही, शाहुकालीन अशा वेगवेगळ््या राजवटींच्या काळातले आहेत. त्यातील जडावाच्या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, मोती, पाचू अशा डोळे दिपवून टाकणाऱ्या, आजवर कधीही न पाहिलेल्या आणि यापूढेही कधी घडणार नाहीत अशा मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे.

देवीच्या अलंकारीक पूजेसाठी या अलंकारांसह पूजाऱ्यांकडे असलेल्या काही दागिन्यांचा वापर केला जातो. अर्पण झालेले नवे दागिने क्वचितच एखाद्या पूजेसाठी शोभून दिसणारे असतील तरच वापरले जातात. यंदा अष्टमीला गतवर्षी एका भाविकाने अर्पण केलेला पाच लाखांचा हार देवीला घालण्यात येणार आहे.

सोमवारी बैठक

नवरात्रौत्सव काळातील व्यवस्थापन व नियोजनासाठी सोमवारी सर्व घटकांची संयुक्त बैठक होणार आहे. यात देवस्थान समितीचे पदाधिकारी, पोलीस-जिल्हा प्रशासन, महापालिका, महावितरण, स्वयंसेवी संस्था-संघटनाांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल. यावेळी भाविकांना सोयीसुविधा, पार्किंग, पाणी, स्वच्छतागृह, आपत्कालीन यंत्रणा, प्रथमोपचार केंद्र, रांगांचे नियोजन यासगळ््यांवर चर्चा होणार आहे.

सीसीटिव्ही, मांडव उभारणी, माहिती फलक

दरम्यान शनिवारपासून देवस्थान समितीकडून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. मंदिर व बाह्य परिसरात करण्यात येत असलेली मांडव उभारणी पूर्ण झाली. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे व्यासपीठही तयार झाले आहे. भाविकांच्या माहितीसाठी चारही दरवाज्यांबाहेर भारतीय पोषाखासंबंधीचे माहिती फलक लावण्यात येणार आहे.

 

Web Title: Complete cleaning of Karabir Nivasini Shri Ambabai's complete decoration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.