पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करावे- शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:40 AM2019-09-10T11:40:42+5:302019-09-10T11:42:48+5:30
कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध ...
कोल्हापूर : पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, प्लास्टिक फुलांवर कायमस्वरूपी बंदी आणावी, शेतीमालास हमीभाव बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, शेतीपूरक व्यवसायासाठीचे अनुदान ९० टक्के करण्यात यावे, यांसह विविध मागण्यांसाठी पॉलिहाऊस व शेडनेटधारक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तरुण शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात पॉलिहाऊस शेतीकडे वळाल्या आहेत; मात्र गेल्या चार-पाच वर्षांत दुष्काळ, नोटाबंदी अशा विविध कारणांमुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत.
नुकताच ओला दुष्काळाचा सामना करावा लागला आहे; त्यामुळे कर्जासह व्याजाची परतफेड करणे शेतकऱ्यांना शक्य नाही. पॉलिहाऊस शेडनेटमधील जरबेरा, डच, गुलाब, कार्नेशन, कलर कॅप्सिकम, व अन्य भाजीपाल्याला हमीभाव नसल्याने व कृत्रिम फुलांमुळे कवडीमोल किंमत मिळत आहेत.
वरील अडचणींचा विचार करून शासनाने कर्जमाफीसह यंदा अनुदानासाठीचा कालावधी वाढवून द्यावा, पुनर्लागवडीचा खर्च द्यावा, खते व कीटकनाशकांवरील कर माफ करावा, अनुदान नाकारलेल्या प्रकल्पांना तत्काळ मंजुरी द्यावी, विमा संरक्षणअंतर्गत त्वरित नुकसानभरपाई मिळावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. शिष्टमंडळात संघटना अध्यक्ष अॅड. माणिक शिंदे, राजश्री निंबाळकर, बाळासो शिंदे, विजय नाईक, रवींद्र वाळवेकर, प्रकाश कांबळे, सदानंद पाटील, सहदेव मिरजे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.