आकुर्डे येथील वसाहतीतील नवीन रस्ता पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:19 AM2021-01-09T04:19:41+5:302021-01-09T04:19:41+5:30
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे तीन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले आणि सुहासिनी अशोकराव भांदिगरे या लोकनियुक्त सरपंच म्हणून ...
गारगोटी : आकुर्डे (ता. भुदरगड) येथे तीन वर्षांपूर्वी सत्तांतर झाले आणि सुहासिनी अशोकराव भांदिगरे या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. तेव्हापासून आकुर्डे गावात अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली. अनेक वर्षे प्रलंबित असणारी पेयजल योजना, गावातील गटारे, रस्ते, भुतोबा देवालय तीर्थक्षेत्र विकास, प्राथमिक शाळा दुरुस्ती, क्रीडांगण अशी बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.
असाच एक गेली अनेक वर्षे गावातील नवीन वसाहतीचा रस्त्याचा प्रश्न कोणतेही आश्वासन न देता पूर्ण केल्याबद्दल तेथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भुदरगड तालुका संघाचे माजी अध्यक्ष अशोक भांदिगरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य कृष्णात पाटील, माजी उपसरपंच डॉ. रवींद्र पारकर, श्रीकांत कांबळे, नितीन पाटील यांची या कामासाठी साथ लाभली.
याचबरोबर गेली 40 वर्षे प्रलंबित व वादात असलेला ग्रामपंचायत ते खोपडा या रस्त्याचा वाद संबंधित खातेदारांच्या सहकार्याने निकालात काढून त्याचेही काम सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत सरपंच सुहासनी भांदिगरे यांच्याशी संपर्क साधला असता, लोकांच्या विश्वासास पात्र राहून गावामध्ये विकासकामे सुरू असून येत्या काळातही अजून बरीच विकासकामे पूर्ण करून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
फोटो ओळ
नवीन रस्त्याची पाहणी करताना अशोक भांदिगरे, कृष्णात पाटील, डॉ. रवींद्र पारकर, शशिकांत कोराणे आदी.