प्रलंबित प्रकल्प त्वरित पूर्ण करा
By admin | Published: April 15, 2015 12:45 AM2015-04-15T00:45:29+5:302015-04-15T00:45:29+5:30
चंद्रकांतदादांचे निर्देश : विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील विमानतळ, विभागीय क्रीडा संकुल, तसेच शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण हे प्रलंबित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित विमानतळ, विभागीय क्रीडा संकुल, तसेच शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
कोल्हापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न व पाठपुरावा करू, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळ विस्तार व विविध सुविधांसाठी भूसंपादन प्रस्तावात समाविष्ट असणाऱ्या सरकारी जमिनीचे हस्तांतरण यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, करवीरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील, उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, विमान पत्तन प्राधिकरणच्या एअरपोर्ट इन्चार्ज रूपाली अभ्यंकर, एम.आय.डी.सी.चे उपअभियंता संजय जोशी उपस्थित होते. विमानसेवा चार वर्षांपासून बंद आहे. विमानतळ भूसंपादनाचा प्रस्ताव कोणी बनवायचा, हा प्रश्न अनुत्तरित असून, याबाबत समन्वय साधण्यासाठी एक अधिकारी नेमावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे
शिरोली-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. रस्ता चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीवेळी इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, तहसीलदार वर्षा शिंगण-पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कामांचे ठेकेदार उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलामध्ये स्पर्धा, शिबिरे आयोजित करावीत
विभागीय क्रीडा संकुलामध्ये पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणी स्पर्धा, शिबिरे आयोजित करावीत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडा अधिकारी नवनाथ फरताडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. उपळे, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक यांच्यासह अन्य अधिकारी व ठेकेदार, वास्तुविशारद उपस्थित होते.