निपाणी-मुरगुड रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा, खासदार संजय मंडलिकांनी दिली सुचना; अचानक केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 06:05 PM2023-03-10T18:05:37+5:302023-03-10T18:06:01+5:30
कामाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित कामही दर्जेदार तसेच पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्याची दिली सुचना
दत्ता पाटील
म्हाकवे : निपाणी- देवगड या आंतरराज्य रस्त्याचे काम मंजूर असूनही अनेक दिवसांपासून या कामाला दिरंगाई होत होती. सध्या, लिंगनुर ते हमिदवाडा दरम्यान या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची खासदार संजय मंडलिक यांनी अचानक भेट देत पाहणी केली. रस्त्याच्या दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त करत उर्वरित पुर्णतः रस्त्याचे कामही दर्जेदार करण्याबाबत तसेच ते पावसाळ्यापूर्वी पुर्ण करण्यात यावे अशा सुचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या.
निपाणी- देवगड हा महत्वपूर्ण असणारा राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नागरिकांनी वारंवार मोर्चे, आंदोलने करून प्रशासनाला जाग आणली. तर यामध्ये खासदार मंडलिक यांच्यासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून अधिकाऱ्यांना कामाच्या पुर्ततेबाबत सुचना करत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे या रस्त्याचे काम सध्या गतीने सुरू झाले आहे.
या मार्गावर अनेक गावे, शाळा, वेडीवाकडी वळणे आहेत. याठिकाणी सुचना फलक तसेच आवश्यक त्या ठिकाणी रंबल पट्ट्या किंवा पांढरे पट्टे ओढण्याच्या सुचनाही खासदार मंडलिक यांनी केल्या. दरम्यान, स्थानिक नागरिकांशी संवादही साधला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, दत्ता पाटील-केनवडेकर, अतुल जोशी, बिद्रीचे माजी संचालक बाजीराव गोधडे आदी उपस्थित होते.