नाट्यगृहासाठी परिपूर्ण प्रस्ताव द्या--नाट्यगृहासाठी अंदाजे खर्च -- 50 ्रकोटी खर्च अपेक्षित
By admin | Published: January 28, 2017 11:43 PM2017-01-28T23:43:10+5:302017-01-28T23:43:10+5:30
शरद पवार : महापालिकेला सूचना, निधीसाठी प्रयत्न करू
कोल्हापूर : शहरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित अद्ययावत अशा नाट्यगृहाचा परिपूर्ण प्रस्ताव मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य सरकारकडे सादर करावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी कोल्हापूर महापालिकेस केली. नाट्यगृहासाठी लागणारी जागा आणि आवश्यक तो निधी देण्याकरिता आपण प्रयत्न करू, असे आश्वासनही पवार यांनी यावेळी दिले.
काही दिवसांपूर्वी महापौर हसिना फरास या शरद पवार यांना भेटायला बारामतीला गेल्या होत्या. त्यावेळी पवार यांनी महापौर फरास यांना शहरात केशवराव भोसले नाट्यगृहाला पर्यायी अद्ययावत नाट्यगृह उभारण्याबाबत जागा सुचविण्याचे तसेच आराखडा तयार करण्याची सूचना केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने एक आराखडा तयार केला आहे. त्याची माहिती महापौर फरास व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पवार यांना दिली.
ई वॉर्ड परिसरातील शासकीय विश्रामगृहाला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या शेतीनजीक सरकारची साडेचार एकर जमीन असून, या ठिकाणी अद्ययावत नाट्यगृह उभारणे सोयीचे असल्याचे नेत्रदीप सरनोबत यांनी पवार यांना सांगितले. येथील सूरत अंजली असोसिएट यांनी सुमारे अडीच हजार प्रेक्षक क्षमतेच्या नाट्यगृहाचा आराखडा तयार केला आहे.
आराखडा पाहून शरद पवार यांनी नाट्यगृहाचे फर्निचर, पार्किंग व्यवस्था, आदींबाबत माहिती जाणून घेतली. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक परिपूर्ण प्रस्ताव तसेच सरकारी जमीन मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करावा, असे त्यांनी सुचविले. राज्याच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून नाट्यगृहाला एकूण खर्चापैकी ७० टक्के रक्कम व जागा देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तीस टक्के रक्कम महानगरपालिकेस घालावी लागणार आहे.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, उपमहापौर अर्जुन माने, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)