नर्सरी बागेतील शाहू समाधीचे काम लवकर पूर्ण करु : आयुक्त कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 04:11 PM2019-05-02T16:11:16+5:302019-05-02T16:11:16+5:30
कोल्हापूर येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत सांगितले. स्मारक परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची सत्तर लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत उभे करण्यात येत असलेल्या शाहू समाधी स्मारकाचे काम सत्तर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम देखील पुढील काही महिन्यात जलदगतीने केले जाईल, असे महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत सांगितले. स्मारक परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची सत्तर लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौर सरीता मोरे यांनी शाहू समाधी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्याकरीता वरिष्ठ अधिकारी,पदाधिकारी, समिती सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती, त्यावेळी आयुक्त कलशेट्टी यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती सांगितली.
समाधी स्मारकाचे काम सध्या कुठेपर्यंत आले आहे याची माहिती देण्याची सुचना महापौर मोरे यांनी अधिकाऱ्यांना केली. तेंव्हा शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले की, स्मारकाचा चबुतरा, समाधी, मेघडंबरी संबंधिची एक कोटी आठ लाखाचे काम पूर्ण झाले आहे. कंपौडवॉलचे एक कोटी दोन लाखाचे काम सध्या सुरु असून तेही पूर्णत्वाकडे चालले आहे.
समाधी परिसरात करण्यात येणाऱ्या लॅँडस्केपिंग तसेच इलेक्ट्रीफिकेशनची ७० लाखाची कामे येत्या वीस दिवसात सुरु केली जातील. या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे पुढील वर्कआॅर्डर देण्याचे काम थांबले आहे. २३ मे नंतर आचारसंहिता संपताच या सुध्दा कामास तातडीने सुरु करण्यात येईल.
महापौर सरीता मोरे, माजी महापौर हसिना फरास, माजी नगरसेवक आदिल फरास, नंदकुमार मोरे यांनी या कामात आयुक्त कलशेट्टी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यावेळी शाहू महाराजांचे हे काम असल्याने सर्वांचीच जबाबदारी आहे. व्यक्तीश: मी या कामात लक्ष घालत आहे. प्रत्येक आठवड्याला कामाचा आढावा घेतला जाईल. लवकरात लवकर हे काम कसे पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयुक्तांनी सांगितले.
शासनाकडे निधीचा पाठपुरावा
समाधी स्मारक, संरक्षक भिंत, लॅँडस्केपिंग , इलेक्ट्रीफिकेशन शिवाय या स्मारकाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाचे सुशोभिकरण, आर्टगॅलरीचे काम करण्याकरीता पाच कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून हा निधी मिळावा म्हणून राज्य सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. निवडणुक आचारसंहिता संपताच हा निधी मिळविण्यासाठी आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे महापौरांनी सुचविले. तेंव्हा आराखडा, प्रस्ताव माझ्याकडे मिळाला की मी त्याकरीता प्रयत्न करतो, असे कलशेट्टी यांनी सांगितले.
या बैठकीस उपमहापौर भूपाल शेटे, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, समिती सदस्य वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, गणेशकुमार खेडके, ठेकेदार व्ही.के. पाटील उपस्थित होते.