झापाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:22 AM2021-03-15T04:22:46+5:302021-03-15T04:22:46+5:30
म्हासुर्ली : झापाचीवाडी (ता. राधानगरी ) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम या १५ मेपर्यंत पूर्ण करून येत्या ...
म्हासुर्ली : झापाचीवाडी (ता. राधानगरी ) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम या १५ मेपर्यंत पूर्ण करून येत्या पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी अडविण्याचे नियोजन करा. म्हासुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यासह प्रकल्पस्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
गेल्या पाच वर्षांपासून झापाचीवाडी नजीकच्या बहिरीचा दरा येथे ३५ एमसीएफटी क्षमतेच्या लघुपाटबंधारे तलावाचे काम सुरू असून, या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे परिसरातील अस्वलवाडी, कुंभारवाडी, झापवाडीसह म्हासुर्ली येथील सुमारे शंभर हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी येथील काम अंतिम टप्प्यात असताना पाणी पूजन केले होते. मात्र, गतवर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगारांच्या कमतरतेमुळे काम बंद राहिले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडण्याच्या आरसीसी प्रवाहिकेसह मुख्य दरवाजाचे काम सुरू केले असून, त्यानंतर उर्वरित माती कामही करण्यात येणार आहे. हे सर्व काम येत्या १५ मे पर्यंत वेगाने पूर्ण करून या पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीत पाणी अडविण्याचे नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश आबिटकर यांनी संबंधितांना दिले आहेत. याचबरोबर या प्रकल्पाच्या खराब पिचिंगचे काम नवीन करण्याबरोबरच प्रकल्पाच्या मुख्य भिंतीतून होणारी पाण्याच्या गळतीसह उर्वरित सर्वच कामे पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी त्यांनी येथे नव्याने सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करून त्यांनाही काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.