नाईट लँडिंगसाठीच्या ‘ॲप्रोच लाईट्स’ची दोन महिन्यात पूर्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:23 AM2021-03-18T04:23:12+5:302021-03-18T04:23:12+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट्स लावण्याचे काम दोन ...
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १९०० मीटरपर्यंत कार्यन्वित करण्यासह नाईट लँडिंग सुविधेसाठी लागणारी ॲप्रोच लाईट्स लावण्याचे काम दोन महिन्यांत प्राधान्याने पूर्ण करणे. अतिरिक्त ६४ एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया विहित कालावधी निश्चित करून पूर्ण करण्याचा निर्णय बुधवारी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांच्यासमवेतच्या संयुक्त बैठक घेण्यात आला आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली.
दिल्लीतील विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला मी आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळ येथे सुरू असलेल्या विकासकामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या अडचणींची माहिती दिली. कोल्हापूरच्या विमानसेवेला गती देण्यासाठी नाईट लँडिंग, धावपट्टी विस्तारीकरण, कार्गो हबची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर अडचणी आणि त्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सध्या कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी १३७० मीटर लांबीची आहे. ही धावपट्टी २३०० मीटर पर्यंत वाढविण्यासाठी लागणारी ६४ एकर जमीन अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया विहीत कालावधी ठरवून पूर्ण करणे. त्यापूर्वी १९०० मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी आणि नाईट लँडिंगसाठी लागणाऱ्या अँप्रोच लाईटसची उभारणी येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नाईट लँडिंग सुविधा लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ होताना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यादृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
चौकट
प्राधिकरणाची समिती कोल्हापूरला येणार
विमान उड्डाणमार्गात असणारे सर्व अडथळे काढण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी हालचाली गतिमान कराव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या अडथळ्यांच्या पाहणी व तपासणीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची तज्ञ समिती लवकरच कोल्हापूर विमानतळास भेट देणार आहे.
प्रतिक्रिया
कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी कामांची प्राथमिकता ठरवून सर्व कामे वेळेत पूर्ण करणे. विमानतळ अद्ययावत होऊन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावे, यासाठी मी प्रयत्नशील आहे.
-खासदार संभाजीराजे
फोटो (१७०२२०२१-कोल-विमानतळ बैठक ०१) : कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रश्नांबाबत दिल्ली येथे बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील, विमानतळ प्रधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक उपस्थित होते.
फोटो (१७०२२०२१-कोल-विमानतळ बैठक ०२) : कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रश्नांबाबत दिल्ली येथे बुधवारी संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष अनुज अग्रवाल, खासदार संभाजीराजे, पालकमंत्री सतेज पाटील, विमानतळ प्रधिकरणाच्या नियोजन समितीचे सदस्य अनिलकुमार पाठक यांनी चर्चा केली.