‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: September 11, 2015 01:10 AM2015-09-11T01:10:31+5:302015-09-11T01:10:31+5:30
सर्किट बेंच प्रश्न : भव्य महारॅली; बहुतांशी शाळा बंद; वकिलांचे आज धरणे आंदोलन
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचप्रकरणी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी फसवणूक केल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला गुरुवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रमुख व्यापारी पेठेतील दुकाने, काही शाळा, विद्यार्थी वाहतूक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. दरम्यान, शहरातील प्रमुख मार्गांवरून खंडपीठ विरोधी कृती समितीने महारॅली काढून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूर शहरात सर्किट बेंच सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु हा निर्णय घेण्यापूर्वीच त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. शहा यांच्या निषेधार्थ सहा जिल्ह्यांतील वकिलांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला.
‘बंद’चे आवाहन करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, वकील रस्त्यावर उतरले होते. सकाळच्या सत्रात संपूर्ण ‘कोल्हापूर बंद’ होते. दुपारी बारा वाजता सर्वपक्षीय रॅलीची सांगता होताच काही भागांतील दुकाने अंशत: सुरू झाली.
मात्र, दुपारपर्यंत शाहूपुरी, राजारामपुरी, स्टेशन रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, बिंदू चौक परिसरातील दुकाने बंद होती. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी बंदला पाठिंबा दिल्याने एकही विद्यार्थी वाहतूक करणारी रिक्षा रस्त्यावर आली नाही. प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा मात्र रस्त्यावर धावताना दिसत होत्या. शहरांतर्गत बस वाहतूक तसेच एस. टी. वाहतूकही सुरू होती. बंद शांततेत पार पडला.
बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा
सर्किट बेंचप्रश्नी तीन दिवस वकिलांनी ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. आज, शुक्रवारी सकाळी १० वाजता जिल्हा सत्र न्यायालयासमोर पुन्हा वकील एकत्र येऊन धरणे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. गुरुवारचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र सावंत यांनी केला.