नेत्यांच्या वारसदारांना संमिश्र यश

By admin | Published: February 24, 2017 12:56 AM2017-02-24T00:56:35+5:302017-02-24T00:56:35+5:30

मंडलिक, भरमूअण्णा, मानेवहिनी, कुपेकर, नरके बंधूंना पराभवाचा झटका;

Composite success to leaders of leaders | नेत्यांच्या वारसदारांना संमिश्र यश

नेत्यांच्या वारसदारांना संमिश्र यश

Next



पी. एन. पाटील, महाडिक, आवाडे, संजयबाबांच्या वारसांना गुलाल
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी नेत्यांच्या वारसदारांना पूर्णपणे झिडकारलेही नाही आणि स्वीकारलेही नाही, अशा पद्धतीचे चित्र निकालानंतर समोर आले आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या वारसदारांना या निवडणुकीत पराभवाचा झटका बसला आहे. मात्र, काही नेते आपल्या वारसदारांना विजयी करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत.
भाजपचे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांची पत्नी शौमिका महाडिक या शिरोली पुलाची मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. येथे अनेक पक्ष, गटांना एकत्र करून सतेज पाटील यांनी महाडिकांच्या पराभवासाठी विडा उचलला होता. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके शिवसेनेकडून कोतोली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत तर दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांचा पुतण्या संग्रामसिंह कुपेकर यांनाही नेसरी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला.
शिवसेनेचे भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांची भावजय रोहिणी अर्जुन आबिटकर या पिंपळगांव मतदारसंघातून स्थानिक आघाडीकडून विजयी झाल्या आहेत.राष्ट्रवादीच्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांची सून वेदांतिका माने या स्थानिक आघाडीतून रूकडी मतदारसंघातून रिंगणात होत्या. त्यांनी भाजपशी जुळवून घेतले होते. मात्र, त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेची सत्ता आल्यास अध्यक्षपदासाठी ज्यांचे नाव घेतले जात होते ते माजी खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचा नातू वीरेंद्र मंडलिक हे बोरवडे मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांंच्याच गटाचे कट्टर समर्थक भूषण पाटील यांची बंडखोरी मंडलिक यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. माजी खासदार दिवंगत उदयसिंहराव गायकवाड यांचा नातू रणवीर गायकवाड शिवसेनेतून शित्तूर वारुण मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा मुलगा राहुल आवाडे हा रेंदाळ मतदारसंघातून स्थानिक आघाडीतून बंडखोरी करून निवडणूक लढवत होता. मात्र, मोठ्या फरकाने त्याने तेथून बाजी मारली आहे. जयवंतराव आवळे यांच्या विरोधामुळे आवाडे यांना येथून उमेदवारी नाकारण्यात आली होती.
दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचा मुलगा आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे माजी सभापती महेश पाटील हे काँग्रेसकडून माणगांव मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांना आणि माजी मंत्री भरमू पाटील यांच्या स्नुषा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल पाटील हा काँग्रेसकडून परिते मतदारसंघातून विजयी झाले आहेत. पाटील हे राहुल याला उमेदवारी देण्यासाठी तयार नसताना कार्यकर्त्यांनी दबाव आणून ही उमेदवारी देणे पी. एन. यांना भाग पाडले होते. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा मुलगा अंबरिश घाटगे हा शिवसेनेतून सिद्धनेली मतदारसंघातून विजयी झाला आहे.
काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांची सून रेश्मा राहुल देसाई ह्या काँग्रेसकडून गारगोटी मतदारसंघातून निवडून आल्या असून माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर हे काँग्रेसकडून सातवे मतदारसंघातून रिंगणात होते मात्र ते पराभूत झाले. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचा मुलगा संदीप नरके हा काँग्रेसकडून कळे मतदारसंघातून पराभूत झाला आहे. सांगरुळचे शेकापक्षाचे माजी आमदार दिवंगत गोविंदराव कलिकते यांचा मुलगा संजय कलिकते यांना कौलवमधून पराभव स्वीकारावा लागला आहे तर शेकापक्षाचे गडहिंग्लजचे दिवंगत माजी आमदार तुकाराम कोलेकर यांचा मुलगा अ‍ॅड. हेमंत कोलेकर भाजपकडून नेसरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी संग्रामसिंह कुपेकरांना पराभूत केले.
कागलचे काँग्रेसचे माजी आमदार हिंदुराव बळवंत पाटील यांचे नातू भूषण पाटील अपक्ष म्हणून बोरवडे मतदारसंघातून रिंगणात होते. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. भुदरगडचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांची सून स्वरुपाराणी जाधव या कडगांव जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

Web Title: Composite success to leaders of leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.