पुन्हा एकदा कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये अवयवदान शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 05:41 PM2019-04-11T17:41:20+5:302019-04-11T18:07:58+5:30

इमारतीच्या बांधकामावरून पडून मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या निर्णयानुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये

Compound surgery at the Diamond Hospital in Kolhapur | पुन्हा एकदा कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये अवयवदान शस्त्रक्रिया

पुन्हा एकदा कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये अवयवदान शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांना जीवदान; अवयव पुण्याला पाठविले  २०१८ रोजी अशाच प्रकारची अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली

कोल्हापूर : इमारतीच्या बांधकामावरून पडून मेंदू मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या निर्णयानुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा गुरुवारी दुपारी राबविली. शिवा सोरेन माहोर (वय १९, रा. नाचणे रोड, रत्नागिरी) असे मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून, त्याची एक किडनी व यकृत ग्रीन कॉरिडॉरद्वारे पुण्यातील ज्युपिटर व सह्याद्री रुग्णालयाकडे पाठविले. यासाठी वाहतूक शाखेने विशेष पोलीस बंदोबस्त ठेवून रस्ते रिकामे केले होते. 

रत्नागिरी येथील नाचणे रोड परिसरात एका पाच मजली इमारतीचे काम सुरू आहे. या कामावर सोरेन माहोर हे आपल्या कुटुंबासह काम करीत आहेत. मूळचे उत्तर प्रदेशातील हे कुटुंब गेली नऊ वर्षे रत्नाागिरीत बांधकामावर काम करीत आहे. मंगळवारी (दि. ९ ) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नाचणे रोडवरील इमारतीमध्ये सेंट्रिंग काम करताना पाचव्या मजल्यावरून सोरेन माहोर यांचा १९ वर्षीय मुलगा शिवा खाली पडला. त्याला तेथे स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथील उपचारानंतर त्याला आहे त्या स्थितीत बुधवारी (दि. १०) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांनी कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर त्याच्या मेंदूत अतिरक्तस्राव झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातच त्याचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाल्याचे सायंकाळी सहा वाजता निष्पन्न झाले व डॉक्टरांनीही मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्याची कल्पना त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली.

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वडील सोरेन यांना अवयवदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाशी चर्चाही केली. ही संकल्पना पटल्यानंतर सोरेन माहोर यांनी रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदानाबाबत सेंट्रल कमिटीशी चर्चा करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी सकाळी पुण्यातील संबंधित रुग्णालयाच्या रुग्णवाहिका ‘डायमंड’ रुग्णालयात दाखल झाल्या. शिवा सोरेन यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्यातील एक किडनी ‘डायमंड’मध्येच एका रुग्णाला प्रत्यारोपण केली; तर ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे दुसरी किडनी सह्याद्री हॉस्पिटलकडे, तर यकृत पुणे येथीलच ज्युपिटर हॉस्पिटलकडे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाठविण्यात आले. 

‘डायमंड’मध्ये न्यूरो सर्जन डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद, किडनी स्पेशालिस्ट डॉ. विलास नाईक यांनी ही शस्त्रक्रिया राबविली. याबाबतची माहिती डॉ. आनंद सलगर यांनी दिली. 

‘ग्रीन कॉरिडॉर’ अवयव रुग्णालयाकडून दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया 
दुपारी साडेचार वाजता शस्त्रक्रियेनंतर एक किडनी पुण्यातील ‘सह्याद्री’मध्ये, तर यकृत ज्युपिटर हॉस्पिटल (पुणे) येथे ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पाठविले. तेथे त्यांचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण केले. यापूर्वी या रुग्णालयात १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अशाच प्रकारची अवयवदान शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा गुरुवारी ही शस्त्रक्रिया करून अवयव पुण्याला पाठविण्यात आले. यात अवयव घेऊन रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, तावडे हॉटेलमार्गे राष्टय महामार्गावरून पुण्याकडे प्रयाण केले. शहरातील मार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एस. बी. पोरे यांच्या नेतृत्वाखाली २५ पोलीस कर्मचाऱ्यांनी  ‘ग्रीन कॉरिडॉर’ राबविला. 


मृत शिवा वडील सोरेन माहोर यांना मदत म्हणून नाचणे येथील इमारतीवर सेट्रिंगचे काम करीत होता. विशेष म्हणजे शिवाने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. तो बारावीत प्रवेश घेणार होता. तत्पूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली. त्यात मेंदू मृत झाला. त्यामुळे त्याला शिक्षण घेऊन मोठे होण्याची त्याची इच्छा अपूर्णच राहिली. माहोर यांचे कुटुंबीय गेली नऊ वर्षे उत्तरप्रदेशातून रत्नागिरीत कामानिमित्त आले आहे. येथेच इमारतींवर काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवितात. शिवाच्या पश्चात त्याच्या कुटुंबात आई, वडील, बहीण आहे. 
 

Web Title: Compound surgery at the Diamond Hospital in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.