राष्ट्रवादीच्या ‘बंद’ला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:28 PM2019-09-27T18:28:20+5:302019-09-27T18:29:57+5:30

राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला.

Comprehensive response to NCP's 'closure' in Kolhapur | राष्ट्रवादीच्या ‘बंद’ला कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद

२) राष्ट्रवादी च्या वतीने शुक्रवारी सकाळी कोल्हापूर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.(छाया- आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देतहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने कोल्हापूर शहरात कार्यकर्ते-पोलिसांत शाब्दिक चकमक

कोल्हापूर : राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या ‘कोल्हापूर बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत राज्य सरकारचा निषेध नोंदविला. शहर राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. बस वाहतूक रोखताना पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांत काही काळ शाब्दिक चकमक उडाली.

शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी  कॉँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारी ‘कोल्हापूर बंद’ची हाक दिली होती. सकाळच्या टप्प्यात अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वत:हून व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे एरव्ही गजबजलेला महाद्वार रोड, पापाची तिकटी, अंबाबाई मंदिर, राजारामपुरी हा परिसर तसा शांतच होता. बस व खासगी वाहतूक सुरू राहिल्याने नागरिकांना त्याचा फारसा त्रास झाला नाही.

शहर राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने सकाळी ११ वाजता महाराणा प्रताप चौकातून दुचाकी रॅली काढून भाजप सरकार, ‘ईडी’ व केंद्र सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. महाराणा प्रताप चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, दाभोळकर कॉर्नर, मध्यवर्ती बसस्थानक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीमार्गे शिवाजी चौकात रॅली विसर्जित करण्यात आली.

शिवाजी चौकात रॅलीत महापौर माधवी गवंडी, प्रा. जयंत पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, महेंद्र चव्हाण, जयकुमार शिंदे, रमेश पोवार, प्रकाश गवंडी, किसन कल्याणकर, जहिदा मुजावर, विनायक फाळके, सचिन पाटील, आदी उपस्थित होते.

करवीर तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने

करवीर तालुका राष्ट्रवादी  कॉँग्रेसच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारच्या कारवाईविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई, अप्पासाहेब धनवडे, दत्ता गाडवे, तानाजी शेलार, सदाशिव पाटील, संभाजी पाटील, रंगराव कोळी, दिलीप सावंत, नामदेव परीट, सुनील परीट, सुरेश पाटील, जी. डी. पाटील, मिलिंद पाटील, राजाराम कासार, सुलतान मुल्लाणी, आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्यावरील कारवाई मागे घ्या, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आला.

 

Web Title: Comprehensive response to NCP's 'closure' in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.