शिवाजी पेठेत ‘राष्ट्रवादी’च्या तडजोडी; कोराणे, राऊत, सावंत यांचे प्रभाग निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:02+5:302020-12-29T04:25:02+5:30
शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान हा राजकीय तसेच सोयीच्या तडजोडी घडवून आणण्यास कारणीभूत ठरला. पद्माराजे उद्यान प्रभागावर ...
शिवाजी पेठेतील प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान हा राजकीय तसेच सोयीच्या तडजोडी घडवून आणण्यास कारणीभूत ठरला. पद्माराजे उद्यान प्रभागावर नागरिकांचा ‘मागासवर्ग - महिला’ असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून माजी नगरसेवक अजित राऊत यांनी त्यांच्या पत्नी माजी महापौर सुनीता राऊत यांना निवडणुकीस उभे करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी उत्तम कोराणे यांनीही त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अर्चना कोराणे यांना उभे करण्याचा निर्णय घेतला. वेताळ तालीम परिसरात प्रत्येक निवडणुकीत एकच उमेदवार उभा करून त्यास निवडून आणण्याचा प्रयत्न यापूर्वी कै. रामभाऊ चव्हाण व कै. बबनराव कोराणे करत होते.
परंतु यावेळी चव्हाण व कोराणे यांच्या निधनानंतर राजकारण बदलले. कोणी लढावे आणि कोणी थांबावे याचा गुंता निर्माण झाला. कोराणे यांना पुढील निवडणुकीत संधी देण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिला होता. त्यामुळे कोराणे यांनी आक्रमक भूमिका घेत मुश्रीफ यांच्याकडे दाद मागितली. गेले दोन-तीन दिवस शिवाजी पेठेत याच घडामोडी घडत होत्या. त्यातून तीन प्रभागांत तडजोडी झाल्या.
संभाजीनगर बस स्थानक प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग - महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे तेथे महेश सावंत यांना उभे राहण्यात अडचणी आहेत. त्यामुळे उत्तम कोराणे यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना राजलक्ष्मीनगर प्रभागातून उभे राहण्याचा सल्ला दिला. सावंत त्यास राजी झाले. सुनीता राऊत यांना संभाजीनगर बस स्थानक येथे उभे करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घ्यायची आणि त्याच्या बदल्यात राऊत यांनी पद्माराजे उद्यान प्रभागावरील हक्क सोडायचा, अशी चर्चा झाली. तिघेही त्यास तयार झाले. त्यानंतर सोमवारी मंत्री मुश्रीफ यांच्यासमवेत बैठक झाली. बैठकीत तडजोडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी आर. के. पोवार, राजू लाटकर उपस्थित होते.
चव्हाण यांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीस या प्रभागातून उभे करण्याची घोषणा केली आहे. कोराणे व चव्हाण नातलग आहेत. अर्चना कोराणे यांची उमेदवारी निश्चित झाल्यामुळे चव्हाण कुटुंबीय काय करणार हा एक मुद्दा उत्सुकतेचा ठरला आहे.