मृत्यू दाखल्यासाठी घरफाळा भरण्याची सक्ती, महापालिकेसमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:08+5:302020-12-17T04:47:08+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी चालू घरफाळा भरल्याची पावती दाखविणे बंधनकारक केले असून, ही बाब व्यावहारिकदृष्ट्या उचित ...
कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी चालू घरफाळा भरल्याची पावती दाखविणे बंधनकारक केले असून, ही बाब व्यावहारिकदृष्ट्या उचित नसल्याचे सांगत कोल्हापूर शहर नागरी कृती समितीच्या वतीने बुधवारी दुपारी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर या संदर्भातील परिपत्रकाची होळी करण्यात आली; तसेच निदर्शने करण्यात आली.
आठ दिवसांपूर्वी जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी महापालिकेचे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी घरफाळा भरण्याची सक्ती केली आहे. त्याचे तीव्र प्रतिसाद बुधवारी उमटले. कोल्हापूर शहर नागरी कृती समितीचे कार्यकर्ते महापालिकेसमोर जमले आणि त्यांनी औंधकर यांच्या परिपत्रकाची होळी केली. ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी; दादागिरी नहीं चलेगी;’ ‘मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई न करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
निदर्शने झाल्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. हा आदेश त्वरित रद्द करावा. घरफाळा घोटाळ्यातील दोषींकडून घोटाळा झालेली रक्कम वसूल करावी, अशी सूचना त्यांना केली.
महापालिकेची थकबाकी वसुली झाली पाहिजे; पण वसुलीसाठी हा मार्ग योग्य नाही. याच महापालिकेत घरफाळा घोटाळा झालेला असून घोटाळा करणारे आणि त्यांना पाठीशी घालणारे मिळकतधारक दरोडेखोर यांच्यावर कारवाई करून रक्कम वसूल करा, अशी मागणी आम्ही गेली सहा महिने करतो आहोत; पण त्यामध्ये चालढकल चाललेली आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.
यावेळी कृती समिती कोल्हापूरचे अशोक पवार, रमेश मोरे, भाऊ घोडगे, यशवंत वाळवेकर, अजित सासने, परवेज सय्यद, रणजित पवार, चंद्रकांत सूर्यवंशी, राजू मालेकर, विनोद डुणुंग, एस. एन. माळकर, उत्तम वंदुरे, शामराव शिंदे, कादर मलबारी उपस्थित हाेते.