संगणकचालकामुळे नोटाबंदीतही रांगा टळल्या

By admin | Published: December 28, 2016 12:02 AM2016-12-28T00:02:01+5:302016-12-28T00:02:01+5:30

नरतवडे येथे उपक्रम : बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेच्या माध्यमातून गावातील लोकांना घरपोच सेवा

Computer operators have also blocked the rope | संगणकचालकामुळे नोटाबंदीतही रांगा टळल्या

संगणकचालकामुळे नोटाबंदीतही रांगा टळल्या

Next

संजय पारकर-- राधानगरी --नोटाबंदीच्या काळात बँकेत शिल्लक असलेले स्वत:चे पैसे काढण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे होणाऱ्या त्रासाची वर्णने दररोज निदर्शनास येत होती. मात्र, याच काळात नरतवडे (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक प्रीतम अशोक पाटील याने बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेच्या माध्यमातून गावातील लोकांना घरपोच पैसे वाटप केले.
घरबसल्या लोकांना विना त्रास सुविधा मिळाली. प्रीतम पाटील हा २०११ पासून या ग्रामपंचायतीकडे संगणक परिचालक म्हणून काम करतो. हे गाव बँक आॅफ बडोदाच्या सरवडे शाखेला जोडले आहे. या बँकेने त्याची आपला सेवा प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आहे. त्याने गावातील पाचशे लोकांची बचत खाती सुरू केली आहेत. बँकेतून कर्ज वाटपही होते. यापूर्वी लोक बँकेत जाऊन व्यवहार करत. मात्र, नोटाबंदीनंतर यात अडचणी निर्माण झाल्यावर बँकेने त्याला गावातच व्यवहार करण्यासाठी बॉश मशीन दिले. या मशीनच्या साहाय्याने आधारकार्ड, एटीएम कार्ड किंवा बोटांच्या ठशांद्वारे रोख रक्कम काढणे, भरणे असे व्यवहार करण्यात येत आहेत. दररोज सकाळी बँकेत जाऊन तो काही रक्कम घेऊन येतो व लोकांना हजार-दोन हजार रुपये याप्रमाणे वाटप करतो. काही कर्जदार कर्जाचा हप्ताही भरतात. तेव्हा जास्त रक्कम जमा होते तेव्हा लोकांना जादा पैसे मिळू शकतात. लोकांना आपल्या सवडीनुसार कोणत्याही वेळी तो सेवा देतो. त्यामुळे आपल्या कामाचा खोळंबा न करता पैसे मिळत असल्याने लोकही खूश आहेत. २६ नोव्हेंबरपासून गेल्या आठवड्यापर्यंत त्याने पाच लाखांपर्यंत रक्कम लोकांना वाटली आहे. या कामासाठी त्याला बँकेकडून महिना अडीच हजार रुपये व प्रत्येक व्यवहारामागे ऐंशी पैसे असे मानधन मिळते.

गटविकास अधिकारी एच. डी. नाईक यांनी नरतवडे येथे भेट देऊन माहिती घेतली व त्याचे कौतुक
केले. यासाठी बँकेचे शाखाधिकारी समीर जठार, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच संजय पाटील, ग्रामसेवक ए. एस. ठोंबरे व ग्रामपंचायत
सदस्यांचे सहकार्य मिळाल्याचे प्रीतम पाटील याने सांगितले.

Web Title: Computer operators have also blocked the rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.