संगणक परिचालक कामावर, नेते वाऱ्यावर!
By admin | Published: February 13, 2015 12:32 AM2015-02-13T00:32:28+5:302015-02-13T00:45:39+5:30
आंदोलनाचा परिणाम : संघटनेच्या नेत्यांना कामावर घेण्यास टाळाटाळ
सांगली : विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या संगणक परिचालक संघटनेच्या दहा तालुक्यातील सुमारे २५ पदाधिकाऱ्यांना अद्याप कामावर रुजू करण्यात आलेले नाही. मात्र आंदोलनात समावेश झालेल्या ४५० हून अधिक परिचालकांना कामावर पुन्हा घेण्यात आले आहे. त्यामुळे ‘कर्मचारी कामावर आणि नेते वाऱ्यावर’ असे चित्र आहे.
दोन महिन्यांपूर्वी संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) मधील परिचालकांनी संघटनेच्या नेतृत्वाखाली मानधन वाढ आणि इतर काही मागण्यांसाठी आंदोलन केले होते.
यावेळी तालुक्यातील परिचालकांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा, धरणे आंदोलन केले होते. प्रशासनाशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर तातडीने प्रशासनाने आंदोलनात सहभागी असणाऱ्या परिचालकांना काही दिवसांपूर्वी पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे. परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले, त्या दहा तालुक्यांतील संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष व जिल्हाउपाध्यक्ष यांना प्रशासनाने अद्याप कामावर घेतलेले नाही. कर्मचाऱ्यांना तत्परतेने कामावर घेणाऱ्या प्रशासनाने पदाधिकाऱ्यांबाबतीत दुजाभाव का दाखविला, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांत निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)