संगणक खरेदी प्रकरण विभागीय आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:02+5:302021-04-17T04:22:02+5:30
कोल्हापूर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निधीतून केलेल्या संगणक खरेदीबाबत स्थायी समिती सदस्यांच्या भावना एका पत्राव्दारे विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले ...
कोल्हापूर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या निधीतून केलेल्या संगणक खरेदीबाबत स्थायी समिती सदस्यांच्या भावना एका पत्राव्दारे विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहेत. याबाबत माणगाव येथे १९ मार्च रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या.
तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील विविध विभागासाठी आणि पंचायत समित्यासाठी संगणक आणि प्रिंटरची खरेदी केली होती. परंतु याबाबत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, मागणी नसताना खरेदी करणे असे आक्षेप सत्तारूढ पदाधिकाऱ्यांसह विरोधी सदस्यांनी ही घेतले होते. याबाबत माणगाव येथे झालेल्या स्थायी समिती सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सदस्यांना तुमच्या भावना विभागीय आयुक्तांकडे कळवू असे सांगितले होते.
त्यानुसार याबाबत स्थायी समितीचा ठराव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. आता याबाबत ते नेमका काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.