शिवाजी विद्यापीठातील संगणक प्रणालीवरील ‘सायबर’ हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 05:12 PM2018-09-21T17:12:47+5:302018-09-21T17:17:49+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर चीनमधील हॅकर्सकडून सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न दि. १४ सप्टेंबरला झाला. हा प्रयत्न विद्यापीठाच्या संगणक केंद्राने हाणून पाडला आहे. विद्यापीठातील माहिती सुरक्षित असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळाला रोज सुमारे साडेतीन लाख वापरकर्ते (युझर) भेट (हिटस्) देतात. विद्यापीठाच्या संगणक प्रणालीवर दि. १४ सप्टेंबरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सायबर ट्राफिक दिसून आले. त्यासह प्रणालीचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. असा प्रकार अधून-मधून वारंवार घडत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण, काहीवेळात वेग मंदावण्याचे प्रमाण वाढले.
संगणक प्रणालीवर सायबर हल्ल्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले. त्यावर संगणक केंद्रातील तज्ज्ञांनी तातडीने सुरक्षाप्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ केली. त्याच्या जोरावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.
आपली फायरवॉल ही प्रणाली सक्षम आहे. त्यासह सायबर ट्राफिकचे लॉग अॅनालेसिस नियमितपणे केले जात असल्याने हॅकर्सला संगणकप्रणालीत प्रवेश करता आला नाही. लोकेशन्स् आणि लॉग अॅनालेसिसवर पाहता या हल्ल्याचा प्रयत्न चायनामधून झाल्याचे दिसून येते.
या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे विद्यापीठातील माहितीला कोणताही धोका पोहोचलेला नाही. सर्व माहिती सुरक्षित आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांसह विद्यापीठाच्या घटकांनी काळजी करू नये.
‘हिट्स’ जादा असलेल्या ठिकाणी हल्ला
हिट्स जादा असणाऱ्या, परिणामकारकता अधिक असलेल्या संगणकप्रणाली, संकेतस्थळांवर हॅकर्सकडून सायबर हल्ला केला जातो. त्यासाठी हॅकर्सकडून सॉफटवेअर रोबोटचा वापर केला जातो. हे रोबोटस् कोणत्या संगणकप्रणालीचे कोड वीक आहेत अथवा पाथ खुले आहेत. त्याचा शोध घेऊन संबंधित माहिती हॅकर्संना उपलब्ध करून देतात.
एखाद्या संस्था, व्यक्तीची बदनामी करणे, माहितीची चोरी करणे, नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने असे सायबर हल्ले होतात. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील रोजच्या हिटस्ची संख्या जादा असल्याने सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता संगणकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी व्यक्त केली.
दक्षता घेणे आवश्यक
विद्यापीठाला सायबर सिक्युरिटीमधील संशोधनासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाकडून सात कोटी रुपयांचे अनुदान जाहीर झाले. याठिकाणी सायबर सुरक्षेचे सेंटर आॅफ एक्सलन्स् होणार असल्याने विद्यापीठाने दक्षता घेणे आवश्यक आहे.