‘मेक इन इंडिया’ विकासाची संकल्पना

By admin | Published: January 26, 2016 12:53 AM2016-01-26T00:53:58+5:302016-01-26T01:22:56+5:30

सुब्रह्मण्यम स्वामी : शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूर वुई केअरतर्फे ‘मेक इन इंडिया’वर विशेष व्याख्यान

Concept of development in 'Make in India' | ‘मेक इन इंडिया’ विकासाची संकल्पना

‘मेक इन इंडिया’ विकासाची संकल्पना

Next

कोल्हापूर : स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विकासाच्या तीन प्रमुख संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यामध्ये पहिली आणि महात्मा गांधी यांच्या प्रभावामुळे तातडीने अस्तित्वात आलेली म्हणजे स्वदेशी. स्वयंपूर्ण ग्रामविकासाच्या संकल्पनेतून राष्ट्रविकास साधण्याचा हा प्रयत्न होता. त्यानंतर नियोजन आयोगाच्या स्थापनेनंतर अस्तित्वात आलेली दुसरी संकल्पना होती आत्मनिर्भरता. ‘जे नाही ते आयात करा आणि आहे ते निर्यात करा’, अशी सर्वसाधारण त्याची रचना होती आणि तिसरी महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘मेक इन इंडिया’ असल्याचे प्रतिपादन या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सोमवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर वुई केअर यांच्यातर्फे आयोजित ‘मेक इन इंडिया’ या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू
सभागृहामध्ये हे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
डॉ. स्वामी म्हणाले, ‘मेक इन इंडिया’ ही भारताच्या विकासासंदर्भातील आजपर्यंतची सर्वाधिक व सर्वसमावेशक संकल्पना आहे. भारताला बाजारपेठ समजून केवळ येथे येऊन आपला माल विकू नका, तर त्याची निर्मितीही येथेच करा. त्याचबरोबर ही निर्मिती केवळ भारतीय ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून करू नका, तर त्या उत्पादनांच्या निर्मितीबरोबर निर्यातही करा, असे आवाहन करणारी ही अत्यंत प्रभावी अशी योजना आहे. ‘मेक इन इंडिया’ योजनेच्या अनुषंगाने परकीय कंपन्यांना येथे उत्पादनास परवानगी देत असतानाच देशी उद्योग आणि परकीय उद्योग यांचा समतोलही साधला जाणे अत्यंत आवश्यक आहे.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’ ही संकल्पना केवळ निर्मिती आधारित नसून, भारताला निर्यातीमध्येही जागतिक स्थान प्रदान करणारी असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड व विराट हिंदुस्थान संग्रामचे जगदीश शेट्टी उपस्थित होते. विद्यापीठाचे कौशल्य विकास समन्वयक डॉ. ए. एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. वुई केअर, कोल्हापूरचे मिलिंद धोंड यांनी आभार मानले. युवा जागर कौशल्य विकास केंद्राचे यशवंत शितोळे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Concept of development in 'Make in India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.