संक्रांत, पतंगाचे नाते आजही घट्ट, पतंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:26 PM2020-01-16T13:26:47+5:302020-01-16T13:28:22+5:30
संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी गर्दी झाली होती.
कोल्हापूर : संक्रांत आणि तिळगुळाचे नाते जितके घट्ट आहे तितकेच घट्ट नाते संक्रांत आणि पतंगाचे आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजणाला पतंगाबाबत आकर्षण असते. पतंग खरेदीसाठी बाजारपेठा फुललेल्या दिसत आहेत; तर सायंकाळी शहरातील मोकळ्या मैदानावर तसेच इमारतींच्या गच्चीवर पतंग उडविण्यासाठी गर्दी झाली होती.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी अनेकांनी पतंग घेतले. गल्लीतील, कॉलनीतील मुलांनी पतंग आणलेला पाहून अनेक मुलांनी आई-बाबांकडे हट्ट करून पतंग खरेदी केली. विशेष करून रंगीबेरंगी पतंग खरेदी न करता पबजी, स्पायडरमॅन, छोटा भीम, डोरेमॉन, अँग्री बर्ड, सुपरमॅन या पतंगांची लहान मुलांकडून मागणी होती. लाकडी फिरक्यांसह मुलांसाठी लहान प्लास्टिकच्या फिरक्याही खरेदी केल्या. बाजारात नायलॉनच्या मांजासह प्लास्टिकबंदीमुळे यंदा पॉलिथीनचे पतंगही दिसेनासे झाले आहेत.
शाळांना सुट्टी असल्यामुळे सायंकाळी पतंग उंचच्या उंच उडविणारी मंडळी, पतंग उडविताना अधूनमधून तिळगुळाचे लाडू तोंडात टाकणे, काटलेला पतंग खाली पडताच ती पकडण्यासाठी मुलांची होणारी धावपळ हे चित्र बुधवारी ठिकठिकाणी दिसले.
पतंगाची किंमत पाच रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत आहे. लहान मुलांकडून कार्टून, रंगीत पतंगांना विशेष मागणी आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने काही प्रमाणात पतंगांची किंमत यंदा वाढली आहे.
- गणेश वडर, विक्रेते