स्त्री-पुरुषांच्या संयुक्त प्रयत्नांनी प्रश्न सुटतील
By admin | Published: January 5, 2017 01:05 AM2017-01-05T01:05:27+5:302017-01-05T01:05:27+5:30
तारा भवाळकर : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कार्यक्रम
कोल्हापूर : काळाच्या पुढे विचार करून समाजातील स्त्री-पुरुष समानतेसाठी महात्मा फुले यांनी केलेल्या प्रयत्नांना सावित्रीबाई फुले यांनी मोलाची साथ दिली. यातूनच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्त्री-पुरुष यांच्या संयुक्त प्रयत्नांची गरज अधोरेखित होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांनी मंगळवारी येथे केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठ सेवक संघातर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते. डॉ. भवाळकर म्हणाल्या, प्रश्न केवळ महिलांचे किंवा पुरुषांचे नसतात, तर ते समाजाचे असतात. स्त्री सबलीकरणासाठी फुले दाम्पत्यांनी केलेली चळवळ आजही पुढे नेण्याची गरज आहे. काळाचे पडदे बाजूला करून महिलांनी कार्यरत व्हावे. पुस्तकी वाचनाने माहिती मिळते;
पण व्यावहारिक जाणिवेने ज्ञान मिळते. विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादनासाठी आजूबाजूची परिस्थिती अभ्यासावी.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाची शिखरे गाठणाऱ्या महिलांची माहिती दिली. या महिलांकडून प्रेरणा घेऊन विद्यापीठातील महिला कर्मचारी काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक महेश काकडे, सेवक संघाचे अतुल एतावडेकर, मिलिंद भोसले, विष्णू खाडे, अनिल साळोखे, अजय आयरेकर, आदी उपस्थित होते. सुरेखा आडके यांनी स्वागत केले. रमेश पोवार यांनी प्रास्ताविक केले. रत्नमाला साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
स्त्री पुजारी का नाही?
देवीच्या देवळात पुरुष पुजारी असून, हे आजचे वास्तव आहे. देवीला साडी नेसविण्यासाठी स्त्री पुजारी का नाही? असा सवाल डॉ. भवाळकर यांनी यावेळी केला. त्या म्हणाल्या, आजही सोवळं-वोवळं यामध्ये वावरणारा समाज स्त्रीचा वापर फक्त पूजेच्या पूर्वतयारीसाठी करून घेतो. पूजेचा मान स्त्रीला मिळाला पाहिजे.