कोरोना कालावधीतील वीज बिले हप्त्यांत भरण्याची सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:23 PM2020-11-28T14:23:56+5:302020-11-28T14:25:44+5:30
mahavitran, bill, kolhapurnews कोरोनाच्या कालावधीतील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन हप्त्यांची, तर याच कालावधीतील थकीत वीज बिले भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.
कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीतील वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना चालू वीज बिलासाठी तीन हप्त्यांची, तर याच कालावधीतील थकीत वीज बिले भरण्यासाठी १२ हप्त्यांची सवलत दिली जाणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्याकोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.
कृषी ग्राहक वगळून सर्व उच्चदाब व लघुदाब वर्गवारीतील पात्र वीज ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेसाठी अर्ज सादर करताना ग्राहकांना थकबाकीच्या दोन टक्के रक्कम भरून २०० रुपयांच्या मुद्रांकावर विनाअट सहभागाचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल.
थकबाकीतील ५० टक्के व्याज माफ
एकरकमी परतफेड योजनेत तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना थकबाकीवरील व्याजात ५० टक्के सूट व वीजपुरवठा खंडित कालावधीतील डिमांड आकारणी माफ होईल. याकरिता १०० टक्के मूळ थकबाकी व दंडाच्या रकमेसह थकबाकीवरील व्याजाची ५० टक्के रक्कम भरावी लागेल.
तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांना एकरकमी परतफेड करता येईल किंवा पाच समान हप्त्यांत वीज बिले भरता येतील. मूळ थकबाकी, दंड व व्याजासह असलेली थकबाकीची ३० टक्के रक्कम भरणा केल्यास उर्वरित थकबाकी चालू वीज बिलासह पाच समान हप्त्यांत भरण्याची मुभा आहे. मात्र उर्वरित हप्त्याच्या रकमेवर वार्षिक १२ टक्के व्याज आकारणी होईल.
कालमर्यादेत अर्ज निकाली
सवलत योजनेतील ग्राहकांचे अर्ज कालमर्यादेत निकाली काढण्यात येणार आहेत. चालू वीज बिल प्रकरणी सात दिवसांच्या आत, तर तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदार ग्राहकांचे अर्ज १५ दिवसांत निकाली काढले जातील.
पुनर्जोडणी प्रक्रिया
१. तात्पुरता व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांना या योजनेत अर्जमंजुरीनंतर थकबाकीची ३० टक्के रक्कम व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजजोडणी.
२. सहा महिने कालावधीच्या आतील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना तांत्रिक व्यवहार्यता तपासून जुन्याच ग्राहक क्रमांकाने वीजजोडणी.
३. सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहक थकबाकीची ३० टक्के रक्कम भरल्यास नवीन वीज जोडणीसाठी पात्र. तांत्रिक व्यवहार्यता पडताळणीअंती नवीन वीजजोडणी शुल्काचा भरणा केल्यानंतरच वीजजोडणी देणार.