जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:19 AM2021-01-14T04:19:41+5:302021-01-14T04:19:41+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी बुधवारी संपली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी ...
शिरोळ : शिरोळ तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी बुधवारी संपली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी पदफेऱ्यांबरोबरच कोपरा सभांवर भर दिला. निवडणुकीच्या रिंगणातील विविध आघाड्यांतील उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सायंकाळी प्रचाराची सांगता केली.
शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचातींपैकी ३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि गावागावांतील गटातटांनी मोर्चेबांधणी सुरू केली. ग्रामपंचायतीमधील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी गटाने डावपेच आखले, तर निवडणुकीत अनेक तरुणांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने प्रस्थापितांना आव्हान दिले. निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याच्या नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना मुभा दिली होती. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची गणितेही या निवडणुकीत अनेकांनी मांडली आहेत.
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे अनिल यादव, आदी नेत्यांनी व्यूहरचना आखली. तालुक्यात २४ जागांची बिनविरोध निवड झाली.
------------------
प्रचाराने रंगत वाढली
निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांनी गेल्या पंधरा दिवसांत प्रचार फेऱ्यांबरोबरच मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिला. काही उमेदवारांनी जातीचे राजकारण करीत प्रचार केला, तर सत्ताधारी सदस्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामाची पोच पावती मतदारांकडे मागितली. तर विरोधी उमेदवारांनी गावच्या प्रलंबित प्रश्नांकडे तसेच ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराकडे मतदारांचे लक्ष वेधले.
............
हळदी-कुंकू कार्यक्रमाने रंग भरला
संवेदनशील असलेल्या दानोळीसह उदगांव, नांदणी, यड्राव, दत्तवाड याठिकाणी जोरदार शक्तिप्रदर्शने झाली. गावात न राहणाऱ्या मतदारांचा शोध घेऊन त्यांना मतदानासाठी आवाहन केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मकर संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाने चांगलाच रंग भरला. घरोघरी जाऊन महिला मतदारांनी हळदी-कुंकूचा कार्यक्रम राबविला.
फोटो - १३०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यात बुधवारी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराची शक्तिप्रदर्शनाने सांगता झाली.