समारोपादिवशी चुरस वाढविणाऱ्या एकांकिका सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:17 AM2021-01-01T04:17:41+5:302021-01-01T04:17:41+5:30
मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्यावतीने आयोजित स्पर्धेत झंकार सांस्कृतिक मंच सोलापूर संघाने ...
मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्यावतीने आयोजित स्पर्धेत झंकार सांस्कृतिक मंच सोलापूर संघाने ‘सांत्वन’ ही एकांकिका सादर केली. वृद्धाश्रमातील दोन वृद्धांची आणि त्यांच्या सुखदु:खाची आंदोलने दाखविणारी ही कथा होती. नाट्यसंपदा डोंबिवली संघाने ‘विमुक्त’ या एकांकिकेत लावण्या नावाच्या मुलीची परिस्थितीमुळे निर्माण झालेली कोंडी आणि तिची त्यातून झालेली सुटका दाखविली. एस. के. बी. स्टुडिओ पुणे या संघाने ‘१२ किमी’ ही एकांकिका सादर केली. एका गरीब कुटुंबाच्या दारिद्र्याशी संबंधित कथा यामध्ये होती. परिवर्तन कला फौंडेशन कोल्हापूर संघाने ‘जंगल जंगल बटा चला है’ ही एकांकिका सादर केली. अनेक निरर्थक कारणांनी समाजात आज वाद होत आहेत आणि समाज दुभंगत आहे. या फुटीचा वेध लांडग्यांच्या गोष्टीच्या माध्यमातून घेण्यात आला. यारी पुणे संघाने ‘गेम झोन’ या एकांकिकेमध्ये एखाद्या व्यक्ती किंवा घटनेमुळे आपण आपलं आयुष्य संपवाव इतकं आपलं आयुष्य स्वस्त नसतं, हा संदेश दिला आहे. पुणे येथील आमचे आम्ही या संघाने ‘लव इन रिलेशनशिप’ ही एकांकिका सादर केली. आजची युवा पिढी आणि त्यांच्या आई-वडिलांची मधली पिढी यांच्यातील नातेसंबंधाची एक हळूवार कथा यामध्ये सादर केली आहे. घोरपडे नाट्यगृहात दीर्घ कालावधीनंतर सादर झालेल्या सर्व नाट्याविष्कारांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
(फोटो ओळी) ३११२२०२०-आयसीएच-०१
एकांकिका स्पर्धेत एस. के. बी. स्टुडिओ पुण्याच्या कलाकारांनी ‘१२ किमी’ ही एकांकिका सादर केली.