स्थायी समितीत एकेरीत वाद
By admin | Published: April 7, 2016 11:47 PM2016-04-07T23:47:56+5:302016-04-08T00:06:33+5:30
जिल्हा परिषद : केबिन, इमारत दुरुस्तीचा विषय गाजला
कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेमधील अधिकारी, पदाधिकारी यांच्या केबिन व इमारत दुरुस्तीवर झालेल्या खर्चाच्या विषयावर उपाध्यक्ष शशिकांत खोत व सदस्य बाजीराव पाटील यांच्यात अरे-तुरे अशा एकेरी शब्दांत गुरुवारी वाद झाला. केबिनमध्ये याला घेऊ नका, असे खोत म्हणताच पाटील संतप्त झाले. जिल्हा परिषद कोणाच्या बापाची नाही. मी सदस्य आहे, अशा शब्दांत खोत यांना पाटील यांनी सुनावले.
अध्यक्षा विमल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक समिती सभागृहात झाली. बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्यासह सर्व विभागप्रमुखांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा सुरू झाली. यावेळी सदस्य बाजीराव पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये आतापर्यंत अधिकारी, पदाधिकारी यांच्या केबिनवर सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. इतक्या पैशात नवीन इमारत बांधून पूर्ण झाली असती. पैशाची उधळपट्टी झाली आहे. इतके पैसे का खर्च केले?
या प्रश्नास उत्तर देताना खोत यांनी पाटील यांच्याकडे पाहून याला केबिनमध्ये येऊ देऊ नका, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यावर संतप्त होऊन पाटील यांनी जिल्हा परिषद कोणाच्या बापाची नाही, अशा शब्दांत उत्तर दिले. यावर पाटील आणि खोत यांच्यात एकेरी शब्दांत वाद, विवाद झाला. यामुळे काही काळ बैठकीत तणाव निर्माण झाला. शेवटी अन्य सदस्यांनी हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला. टंचाई आराखड्यातील किती कामे सुरू आहेत, अशी विचारणा सदस्य धैर्यशील माने, हिंदुराव चौगले यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी आराखड्यातील काही कामे मंजूर झाल्याचे सांगितले. चर्चेवेळी चौगले म्हणाले, पाणीटंचाई भासत आहे. काही ठिकाणी विंधन विहिरींची खुदाई केली जात आहे. विंधन विहिरींवर विद्युत पंप बसविण्यासाठी जिल्हा परिषद स्वनिधीतून निधीची तरतूद करावी. दरम्यान, यावर खोत यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे चौगले आणि खोत यांच्यातही वाद झाला. (प्रतिनिधी)
सायकल, शिलाई यंत्र अंतिम टप्प्यात
समाजकल्याण आणि महिला बालकल्याण विभागाकडील सायकल, शिलाई यंत्र खरेदीच्या प्रक्रियेत नामांकित कंपन्यांनी अन्य कंपन्यांच्या तुलनेत कमी किमतीची निविदा भरली नाही. त्यामुळे सायकल, शिलाई यंत्र खरेदीला गेल्या सर्वसाधारण सभेत स्थगिती दिली होती. हा विषय चर्चेत आला. त्यानंतर नामांकित कंपन्यांनी अन्य कंपन्यांपेक्षा कमी किमतीमध्ये सायकल, शिलाई यंत्र देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे देशमुख यांनी बैठकीत सांगितले.