एकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होणार; ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:32+5:302021-04-24T04:39:44+5:30
विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप ...
विश्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या कलम ३ (३) नुसार गाळप झालेल्या उसाची किंमत १४ दिवसात त्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असलेली अट शिथिल करून कारखान्यांनी शेतकऱ्यांशी करार करून उसाची वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) दोन-तीन टप्प्यात द्यावी,
अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र शासनाच्या नीती आयोगाने तशी शिफारस केली असून, त्यानुसार राज्य शासनाने साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाची नियुक्ती गुरुवारी केली आहे. मात्र यामुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार आहे.
साखरेच्या दरावर नियंत्रण नसल्याने त्यातील चढ-उतारामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देताना दमछाक होते, परंतु केंद्र सरकारने साखरेचा दर निश्चित न करता शेतकऱ्यांना बिले देण्याची पद्धतच कायद्याने बदलण्याचा विचार सुरू केला असल्याचे दिसत आहे.
ही मूळ मागणी देशभरातील सहकारी व खासगी साखर उद्योगाने केंद्र शासनाकडे केली होती. त्यानुसार नीती आयोगानेही तशी शिफारस करून त्याची कार्यपद्धती निश्चित करण्याचे आदेश राज्य सरकारांना दिले आहेत.
ऊस नियंत्रण आदेशानुसार आता गाळप झालेल्या उसाचे बिल १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. ते देता येत नसेल तर कारखाने हे बिल कसे देणार, याचा शेतकऱ्यांशी करारनामा करून कार्यपद्धती निश्चित करू शकतात. अलीकडील काही वर्षांत कारखाने वार्षिक सभेत दोन-तीन टप्प्यांत एफआरपी देण्याचा ठराव मंजूर करून घेतात; परंतु तो साखर आयुक्तांना मान्य नाही.
कारखान्यांना प्रत्येक शेतकऱ्याशी स्वतंत्र विहीत नमुन्यात करार करून एफआरपी देता येते. त्यानुसार साखर संघाने राज्यभरातील कारखान्यांना असा मसुदा पाठवला आहे. त्यानुसार कारखाने २, ३ किंवा ४ टप्प्यातही एफआरपी देऊ शकतात, असे बदल करण्याचे प्रयत्न आहेत.
ज्या वर्षीची एफआरपी त्याच वर्षाचा उतारा विचारात घेऊन निश्चित केली जावी, असाही बदल
करण्यात येत आहे. ज्या वर्षीची एफआरपी त्याच वर्षाचा उतारा विचारात घेऊन निश्चित केली
जावी, असाही बदल करण्यात येत आहे.