आयीजीएम रुग्णालयाची स्थिती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:35+5:302021-05-06T04:25:35+5:30
कोल्हापूर : राज्यातील रुग्णालयांमधील वाढत्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ऑडिटमध्ये इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालय (आयजीएम) धोकादायक ...
कोल्हापूर : राज्यातील रुग्णालयांमधील वाढत्या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील रुग्णालयांच्या ऑडिटमध्ये इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालय (आयजीएम) धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील विद्युत उपकरणे, वायरिंग, इलेक्ट्रिक फिटिंग तसेच इमारतदेखील धोक्याच्या वळणावर असून येथे तातडीने उपायोजना करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी अहवालात मांडले आहे.
भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीसह राज्यातील विविध रुग्णालयांत शाॅर्टसर्किट होऊन रुग्ण दगावण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात शासकीय व खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालीची तपासणी, फायर, इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडिटचा समावेश होता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याच अध्यक्षतेखाली १७ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने २८ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील ८५ रुग्णालयांचे ऑडिट करून त्याचा अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनापुढे ठेवला आहे.
या दरम्यान समितीला आयजीएममधील फायर, इलेक्ट्रिक व स्ट्रक्चरल ऑडिट करताना गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. येथील पाच वॉर्डांमधील इलेक्ट्रिक वायरिंग, स्विच, स्विचबोर्ड, इलेक्ट्रिक फिटिंग, इलेक्ट्रिक केबीन, ट्रान्सफॉर्मर, एसी अशा विद्युत उपकरणांशी संबंधित बाबी गंभीर स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही इमारत बरीच जुनी असल्याने ऑपरेशन थिएटरमध्ये तसेच वॉर्डांमध्ये, स्वच्छतागृहांमध्ये गळती आहे, ते सुस्थितीत नाहीत, फॅन, पिण्याचे पाणी अशा मूलभूत सुविधादेखील तिथे नसल्याचे तज्ज्ञांना दिसून आले. येथील इलेक्ट्रिक फिटिंग, वायरिंगसारख्या बाबी तातडीने बदलणे गरजेचे आहे. इमारतीला लागलेली गळती काढावी लागणार असल्याचे मत अहवालात नोंदवण्यात आले आहेत. या समितीव्यतिरिक्त महापालिका हद्दीतील रुग्णालयांचे महापालिकेच्या वतीने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही इमारतींचे ऑडिट करण्यात येत आहे. त्यांचादेखील अहवाल आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
---
अन्य रुग्णालयांमधील त्रुटी...
गडहिंग्लजसह जिल्ह्यातील काही रुग्णालये चिंचोळ्या भागात असल्याचे आढळले आहे. चुकून येथे एखादी दुर्घटना घडली तर अग्निशमनची गाडीदेखील तेथे पोहोचू शकणार नाही, काही रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा नाही, ऑक्सिजन सिलिंडर नेण्यासाठी ट्रॉली नाही, तज्ज्ञ प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, चांगले स्वच्छतागृह, पाणी, फॅनसारख्या मूलभूत सोयी नाहीत, गॅस सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्थित ठेवलेले नाहीत, त्यांच्या सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली गेलेली नाही, अशा काही त्रुटी आहेत.
---
अहवाल चार भागांत
जिल्ह्यातील ८६ पैकी ७८ रुग्णालये ही खासगी आहेत. आठ रुग्णालये शासकीय आहेत. समितीचा अहवाल रुग्णालयांनी तातडीने करायच्या उपाययोजना, पुढील सात-आठ दिवसांत काेणत्या बाबी करून घ्याव्यात, भविष्यात करायच्या गोष्टी व कायमस्वरूपी उपाययोजना अशा चार भागांत विभागला आहे. त्यानुसार रुग्णालयांची यादी करण्यात येत असून रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करून घेण्याचे पत्र पाठवण्यात येणार आहे. काही रुग्णालयांनी तज्ज्ञांकडून आलेल्या किरकोळ सूचनांची तातडीने अंमलबजावणीदेखील केली आहे.
---
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट केले असून त्यात आयजीएमची इमारत जुनी असल्याने येथील स्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आले आहे. अन्य रुग्णालयांमध्ये कमी जास्त प्रमाणात त्रुटी असून त्या दूर करण्याचे पत्र पाठवण्यात येणार आहे.
प्रशांत पटलवार
समिती सदस्य सचिव व प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, कोल्हापूर