कळंबा तलावातील मनोऱ्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:29+5:302021-09-16T04:29:29+5:30
कळंबा : कळंबा तलावाच्या बंधाऱ्याच्या मध्यभागी उभ्या मनोऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तलावाची मालकी मिरवणाऱ्या पालिका प्रशासनाने याची ...
कळंबा : कळंबा तलावाच्या बंधाऱ्याच्या मध्यभागी उभ्या मनोऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तलावाची मालकी मिरवणाऱ्या पालिका प्रशासनाने याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. या मनोऱ्याकडे जाणाऱ्या मार्गाची पडझड झाली असून, मनोऱ्याचे पत्रे उडून गेले आहेत. मनोऱ्याच्या बाजूस असणारे लोखंडी संरक्षक कठडे पूर्णपणे तुटले आहे. त्यामुळे पर्यटकांचा तोल गेल्यास तलाव पात्रात पडून अनर्थ घडण्याची भीती आहे. मनोऱ्याच्या मध्यभागी पंचवीस फूट खोल खड्डा आहे. त्याच्यावरील पत्रा टाकला आहे. मात्र, हा पत्रा गंजून अर्धवट तुटला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी याची दुरुस्ती करा, अशी मागणी होत आहे. तलावातील पाणी सायफन पद्धतीने निर्गतीकरण करणाऱ्या मोठ्या जलवाहिन्या या मनोऱ्याच्या खाली असून, मनोऱ्यास ठिकठिकाणी बेलमुख आहेत. तलावाची पाणीपातळी जसजशी कमी होत जाते तसे बेलमुखातून पाणी कळंबा फिल्टर हाउसकडे वितरित होते. त्यामुळे या मनोऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे तत्काळ लक्ष न दिल्यास भविष्यात मोठा अनर्थ होण्याची भीती आहे. संबंधित प्रशासनाने या प्रश्नी लक्ष घालून त्याची दुरस्ती करणे गरजेचे आहे.
फोटो : १५ कळंबा मनोरा
कळंबा तलावातील मनोऱ्याची दुरवस्था झाली असून, संरक्षक कठडे तुटले आहे. शिवाय छतही उडून गेले आहे.