हॉटेल, बार, रेस्टॉरंटना १० पर्यंत सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:37 AM2020-10-10T11:37:06+5:302020-10-10T11:40:17+5:30
hotel, kolhapur, collector, coronavirus, Coronavirus Unlock राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना, अटी व शर्ती घालून जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टारंटना क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश दिले.
कोल्हापूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार मार्गदर्शक सूचना, अटी व शर्ती घालून जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टारंटना क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेसह सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबतचे आदेश दिले.
मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट व बारवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे अधिकार महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना, तर ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी यांना आहेत.
नियमांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व महापालिकेचे अधिकारी या संयुक्त पथकाकडून केली जाणार आहे. ग्रामीण भागात महसूल अधिकारी, पोलीस, तसेच रेस्टॉरंटच्या संघटनेने उपलब्ध करून दिलेले प्रतिनिधी यांची पुरेशी संयुक्त पथके नेमून नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर आवश्यक ती दंडात्मक कारवाई केली जाईल.
पोलीस अधीक्षक व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महत्त्वाचे नियम
- ग्राहकांची कोरोनासंबंधित (थर्मल गन वापरणे), खोकला, सर्दी यांची तपासणी.
- लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा; अन्यथा प्रवेश नाकारावा.
- प्रतीक्षेत असताना योग्य त्या शारीरिक अंतराचे पालन करावे.
- ग्राहकाची संपूर्ण माहिती संपर्क क्रमांकासह घेणे बंधनकारक.
- जेवणाव्यतिरिक्त ग्राहकांनी आवारामध्ये मास्क वापरणे बंधनकारक
- हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून देणे.
- बिले अदा करताना शक्यतो संगणकीय प्रणालीचा वापर
- विश्रांतीगृह आणि हात धुण्याची ठिकाणे वारंवार निर्जंतुकीकरण करावीत.
- ग्राहकांशी वारंवार संवाद साधत असलेल्या काउंटरवर फ्लेक्सीग्लास स्क्रीनचा वापर
- प्रवेश व बाहेर जाण्यासाठी वेगवेगळी व्यवस्था.