हुपरी येथे कोविड सेंटरसाठी आरोग्य अधिकाऱ्यास कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:19 AM2021-05-30T04:19:56+5:302021-05-30T04:19:56+5:30
हुपरी बातमी हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील कोरोनाबाधित गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी हुपरी शहरात ...
हुपरी बातमी
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील कोरोनाबाधित गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी हुपरी शहरात कोविड केअर सेंटर सुरू करावे या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून टाळाटाळ करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे यांना शिवसैनिकांनी त्यांच्याच कार्यालयात सुमारे तासभर कोंडून घातले. हुपरी येथे कोविड सेंटर सुरू करण्याचा आदेश हाती घेतल्यानंतरच आरोग्य अधिकारी कोरे यांची शिवसैनिकांनी सुटका केली.
गेल्या काही दिवसांत हुपरी शहर व परिसरात कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तसेच तिसऱ्या, लाटेचा धोकाही संभवतो आहे. अशा परिस्थितीत हुपरी व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी जवळपास कोणतेही कोविड सेंटर अथवा टेस्टिंग सेंटर उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना टेस्टिंग व उपचारासाठी शहरांत जावे लागते. यासर्व बाबींमुळे संशयित रुग्ण आजार अंगावर काढणे अथवा पुरेशा सोयी-सुविधा विना घरीच उपचार घेणे पसंत करीत आहेत. परिणामी परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. त्यामुळे शहरात शासनाचे कोविड सेंटर व टेस्टिंग सेंटर (आर.टी.पी.सी.आर व अँटिजन)तत्काळ उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिष्टमंडळासह आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना भेटून केली होती. मात्र, आरोग्य विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष करीत टाळाटाळ चालविली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आरोग्य अधिकारी कोरे यांना हातकणंगले येथील त्यांच्याच कार्यालयात तासभर कोंडून घालत धारेवर धरले. शिवसैनिकांच्या आक्रमक पावित्र्यामुळे आरोग्य अधिकारी कोरे यांनी हुपरी येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचा तत्काळ आदेश काढला. त्यामुळे शहरात कोविड सेंटर सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यावेळी विनायक विभूते, शहरप्रमुख अमोल देशपांडे, नगरसेवक बाळासो मुधाळे, राजेंद्र पाटील, संजय वाईंगडे, महेश कोरवी, भरत देसाई, राहुल हजारे, मधुकर परीट, धोंडीराम कोरवी आदी उपस्थित होते.
२९ हुपरी कोविड शिवसेना