जयसिंगपूर पालिकेसाठी व्यूहरचना

By admin | Published: October 11, 2015 11:25 PM2015-10-11T23:25:46+5:302015-10-12T00:30:13+5:30

सत्ताधाऱ्यांकडून चाचपणी : आगामी निवडणुकीचे वेध; विरोधात कोण लढणार? आतापासूनच चर्चा --नगरपालिका वार्तापत्र

Configuration for Jaysinghpur Municipal Corporation | जयसिंगपूर पालिकेसाठी व्यूहरचना

जयसिंगपूर पालिकेसाठी व्यूहरचना

Next

संदीप बावचे -- जयसिंगपूर-मतदार नोंदणी कार्यक्रमाने जयसिंगपूर सार्वत्रिक निवडणुकीचा श्रीगणेशा झाला आहे. २०१६ मध्ये निवडणुका गृहीत धरून सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीकडून आतापासूनच व्यूहरचना आखली जात असल्याचे चित्र आहे, तर विरोधी आघाडीत कोण असणार, स्वाभिमानीची भूमिका व शिवसेना, भाजप, शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी कोणता निर्णय घेणार, या चर्चेला जोर आहे. गत निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीची एकहाती सत्ता नगरपालिका निवडणुकीत आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती, शिवसेना व भाजपने मोट बांधून निवडणूक लढली होती. मात्र, निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता. या निवडणुकीतील पराभवानंतर खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा निवडणूक न लढण्याचे भाष्य केले होते. मतदार नोंदणी कार्यक्रमाने जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीचा श्रीगणेशा झाला आहे. एकसदस्यीय प्रभाग रचना होणार असल्याने अनेक इच्छुकांकडून आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले जात आहे. सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीकडूनही व्यूहरचना आखली जात आहे. नगरपालिकेची निवडणूक गृहीत धरून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भाजप यांची भूमिका काय असणार, हा मुद्दा असला तरी केडीसीसी निवडणुकीत स्वाभिमानीने यड्रावकर गटाला मदत केली आहे. नगरपालिका निवडणुकीत ही मदत पुन्हा राहणार का? असाही प्रश्न आहे. शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी मध्यंतरी नगरपालिकेत बैठक घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्नांवर नेम साधण्याचा प्रयत्न केला होता. आमादर पाटील शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकीचे शिवधनुष्य उचलण्याची शक्यताही नाकारता येत नाही. केडीसीसी व गोकुळमधील निवडणुकीचे उट्टे काढण्यासाठी बहुजन विकास आघाडी जयसिंगपूर पालिका निवडणुकीत उतरणार असेच चित्र आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असणारे भाजप जयसिंगपूर पालिकेत स्वतंत्र निवडणूक लढविणार का? हाही मुद्दा उपस्थित होत आहे. कोल्हापूर महापालिकेप्रमाणे कॉँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष पक्षीय चिन्हावर निवडणुका लढतील, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर कॉँग्रेस पक्षात शिथिलता आली असली, तरी त्यांचे पुत्र व दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांची नगरपालिका निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
सध्यातरी विकासकामांतून विरोधकांना प्रत्युत्तर देण्याची तयारी सत्ताधारी गटाकडून सुरू आहे. आतापासूनच राजकीय तर्कवितर्कांना ऊत आला असला, तरी जयसिंगपूर नगरपालिकेची आगामी निवडणूक विविध कारणांनी गाजणार, हे मात्र निश्चित.


राजकीय सत्ता : समीकरणे बदलली
विधानसभा निवडणुकीत बदलेली राजकीय समीकरणे, गोकुळ दूध संघ व केडीसीसी बॅँकेच्या निवडणुकीतील घडामोडींमुळे तालुक्यातील राजकारणात मोठा बदल झाला आहे. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढल्यामुळे तालुक्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली होती. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही हा राजकीय रंग मोठ्या प्रमाणात दिसून आला.

Web Title: Configuration for Jaysinghpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.